Mumbai Rain Update Pudhari
मुंबई

Mumbai Rain Update: राज्यात पावसाचा कहर! मुंबई-गोवा महामार्ग बंद, मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला; नद्या धोक्याच्या पातळीवर

Mumbai Goa Highway Rain: राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्ग, खोपोली-पेण मार्ग आणि मुंबई-पुणे मिसिंग लिंक परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Mumbai Goa Highway Rain: राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः कोकण, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि घाटमाथा परिसरात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, रस्ते पाण्याखाली जाणे आणि वाहतूक ठप्प होणे अशा घटना घडत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. चिपळूणजवळील खवटी परिसरात महामार्गावर मोठी दरड कोसळल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. प्रशासनाकडून पहाटेपासून दरड हटवण्याचे काम सुरू असले, तरी सततचा पाऊस आणि खराब हवामानामुळे कामात अडथळे येत आहेत.

दरम्यान, परशुराम घाट परिसरातही परिस्थिती चिंताजनक आहे. ओमेगा हॉटेललगतच्या डोंगरातून माती घसरू लागली असून मोठे दगड खाली येत आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी आणखी मोठी दरड कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

10 ते 12 तासांपासून वाहनचालक अडकले

महामार्गावरील अडथळ्यांमुळे अनेक वाहने गेल्या 10 ते 12 तासांपासून जागच्या जागी अडकून पडली आहेत. प्रवाशांना अन्न, पाणी आणि इंधन मिळत नाही. प्रशासन या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

खोपोली-पेण महामार्ग पाण्याखाली

रायगड जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे खोपोली-पेण महामार्गही पाण्याखाली गेला आहे. सारसन ते इसांबा फाटा दरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पाताळगंगा आणि भोगावती नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने परिसरातील परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.

मुंबई-पुणे मिसिंग लिंकला पावसाचा फटका

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नव्याने उभारण्यात आलेल्या 'मिसिंग लिंक' प्रकल्पालाही मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. प्रकल्पातील एका भागाचा स्लॅब खचल्याने त्यामधून मोठ्या प्रमाणात पाणी आणि माती आत शिरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लोणावळा आणि घाटमाथा परिसरात आणखी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्यामुळे प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तसेच जुना महामार्ग टाळण्याचे आवाहन केले आहे. काही रेल्वे मार्गांवरही दरड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

महाडमध्ये सावित्री नदी धोक्याच्या पातळीवर

रायगड जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून महाड शहरात पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या भागात पाणी शिरले आहे. शहरातील काही बाजारपेठा आणि आजूबाजूच्या शेतीतही पुराचे पाणी घुसल्याने नागरिकांची धावपळ उडाली आहे. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत नदीकाठच्या भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे.

साताऱ्यात दगड कोसळून चालकाचा मृत्यू

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातही पावसामुळे मोठी दुर्घटना घडली. फलटण-पुसेगाव मार्गावरील ताथवडे घाटात डोंगरावरील मोठा दगड एका कारवर कोसळल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. मृत चालकाची ओळख योगेश पोपट जगताप (रा. आंबे खुर्द, बारामती) अशी झाली आहे.

मुसळधार पावसामुळे डोंगरावरील दगड सैल झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दगड वाहनाच्या पुढील काचेवर आदळल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यालगतच्या दिशादर्शक फलकावर जाऊन धडकली. या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

हवामान विभागाने कोकण आणि घाटमाथा परिसरात पुढील काही तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे डोंगराळ भाग, घाट रस्ते आणि नदीकाठच्या परिसरात जाणे टाळावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील अनेक भागांत अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.,

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT