कोलाडः रखडलेल्या मुंबई -गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरुन आंबेवाडी ग्रामस्थांनी गेले सहा दिवस सुरु केलेले उपोषण रोहा तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले.जर दिलेल्या आश्वासनांची पुर्तता न केल्यास पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
सलग सहा दिवस येथील नागरिकांचे साखळी उपोषण सुरु होते. शनिवारी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी धीरज शहा, रोहा तहसीलदार किशोर देशमुख तसेच कोलाड सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन मोहिते यांनी उपोषणास बसलेल्या नागरिकांशी चर्चा केली. यानंतर तहसीलदार किशोर देशमुख यांनी मंत्री भरत गोगावले
यांच्या अध्यक्षेतेखाली जिल्हा प्रशासन व महामार्ग संबंधित अधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल तो पर्यंत उपोषणास स्थगिती द्यावी असे लेखी निवेदनाद्वारे सांगण्यात आले.
यावेळी माजी सरपंच सुरेश महाबळे, चंद्रकांत लोखंडे, गणेश शिंदे, महेंद्र वाचकवडे, संजय कुर्ले, चंद्रकांत जाधव, समीर महाबळे, बबलु सय्यद, संजय लोटणकर,विजय बोरकर,मंगेश सरफळे,असिफशेठ सय्यद,उदय खामकर, दगडू हाटकर यांच्यासह व्यापारी नागरिक उपस्थित होते.
आंबेवाडी कोलाड वरसगांवच्या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला 200 मीटर अंतरावर अंडरपास बोगदे देण्यात ठेवणे, सर्विस रोडचे अर्धवट असलेले काम पूर्ण करून देणे, गटारावरील झाकणे बसवून देणे,तसेच सदर अंडरपास पेण, नागोठणे, लोणेरे, महाड येथे ठेवले आहेत त्या धर्तीवर करून द्यावे.