मुंबई : वरळी येथील सेंचुरी मिलची जमीन विकाल तर याद राखा,असा इशारा गिरणी कामगार तरुण स्वराज्य संघटनेने राज्य सरकारला दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष तेजस कुंभार व सचिव विठ्ठल चव्हाण यांनी यावर संघटनेची भूमिका स्पष्ट केली .
सेंचुरी मिलची 6 एकर जमीन विक्रीसाठी लिलावात काढण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे गिरणी कामगार वर्गात संतापाची लाट उसळली आहे. लवकरच या जमिनीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. कामगारांच्या घरांसाठी असलेली मागणी डावलून महापालिका नफ्यासाठी ही जमीन विकत असल्याबद्दल कामगारांत तीव्र नाराजी पसरली आहे. सुमारे 45 ते 50 वर्षांच्या भाडेतत्त्वावरील करार नुकताच संपुष्टात आल्यानंतर महापालिकेने ही जमीन ताब्यात घेतली आहे. आता नव्या धोरणानुसार या जमिनीची विक्री केली जाणार आहे. एकीकडे कामगार हक्काच्या घरांसाठी सातत्याने मोर्चा, आंदोलन करून हक्काची मागणी करीत असताना कामगारांचा असा विश्वासघात करणे सरकारला महागात पडेल,असा इशारा तेजस कुंभार व विठ्ठल चव्हाण यांनी दिला. राज्यात सुमारे सेंचुरी मिलचे 7500 पेक्षा जास्त गिरणी कामगार घरांसाठी पात्र ठरलेले असताना शासनाने तातडीने तिथे घरे बांधण्यास सुरुवात करावी,अशी मागणी असताना शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप संघटनेने यावेळी केला.