घाटकोपर, पुढारी वृत्तसेवा : घाटकोपरच्या चिरागनगर विभागात टेम्पोने चिरडल्याने एक महिलेचा मृत्यू तर चार जण जखमी झाले होते. या घटनेनंतर आता पालिका एन विभागाने इथल्या अनधिकृत बांधकामांवर सोमवारी (दि. ६) कारवाईचा बडगा उचलला. या विभागात सोमवारी मोठी संयुक्त कारवाई करण्यात आली. (Mumbai Ghatkopar News )
एलबीएस मार्गापासून चिराग नगर मार्केट पर्यंत १५० च्या आसपास दुकानांच्या अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. पदपथांवर लावण्यात आलेले धंदे, ठेवण्यात आलेले बाकडे आणि इतर साहित्य पालिकेने तोडून टाकत ताब्यात घेतले. अपघात झाला, तेव्हा या मार्गावर चालण्यास देखील जागा नसल्याचे आणि मोठ्या प्रमाणात पदपथांवर , रस्त्यांवर अतिक्रमण झाल्याची स्थानिक नागरिक यांनी तक्रार केली होती. यानंतर पालिका एन विभागाचे सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी या बाबत कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यांच्या नेतृत्वात अतिक्रमण निर्मूलन, इमारत आणि आस्थापना, आरोग्य, परीरक्षण अशा सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्र येत ही मोठी कारवाई केल्याने इथल्या मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला.
आज सारखीच कारवाई ही वारंवार होणार असून नागरिकांना चालण्यास चांगले रस्ते रहावेत. म्हणून पालिका कठोर कारवाई करीत राहणार आहे, स्थानिक नागरिकांनी ही त्यामुळे अशी अनधिकृत बांधकामे करू नये, अशी विनंती पालिका सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी केली आहे.