Mumbai Rain Alert Pudhari
मुंबई

Mumbai Rain Alert: मुंबईत बरसल्या पावसाच्या सरी; २४ जूनपर्यंत 'यलो'अलर्ट

उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: वाढत्या उष्म्याने मुंबईकर अक्षरश: त्रस्त झाले होते. घरातून बाहेर पडताच अंगाची लाही-लाही होत होती. अशा वातावरणात गेल्या १५ दिवसांपासून मान्सूनची वाट पाहणाऱ्या मुंबईकरांना रविवारी सकाळी आलेल्या पावासाच्या सरींनी काही अंशी दिलासा मिळाला.

पावसाला सुरूवात झाल्यामुळे आल्हाददायक वातावरण निर्माण झाले. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी २४ जूनपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात सकाळी नऊ वाजल्यापासून पावसाच्या जोरदार सरी पडल्या. भारतीय हवामान विभागाने शहरात वादळी वारे, गडगडाट, आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मुंबईत अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली.

रविवारी सकाळी ९ वाजता ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मात्र दुपारनंतर पुन्हा उन्ह पडल्याने नागरिकांना पावसाची वाट पाहावी लागली. २३ जूनपर्यंत मुंबईत अधूनमधून पावसाच्या सरी सुरू राहतील.

राज्यात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती तयार होत असून सध्या पडणारा विखुरलेला पाऊस ही सामान्य प्रक्रिया आहे. पावसामुळे तापमानातही घट झाली. सांताक्रूझ वेधशाळेत किमान तापमान २५.८ अंश सेल्सिअस तर कुलाबा वेधशाळेत २६.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

याआधी शनिवारी हे तापमान २८.६ अंशांवर होते. शिवाजी पार्क परिसरात अनेक नागरिक पावसाचा आनंद घेताना दिसून आले. काही ठिकाणी नागरिकांनी सकाळच्या पावसात फेरफटका मारत हवामानातील बदलाचा आनंद लुटला.

विविध भागांतील पावसाची नोंद

  • वरळी २५ मिमी

  • घाटकोपर २४ मिमी

  • लोअर परळ २१ मिमी

  • चेंबूर २० मिमी

  • मानखुर्द १६ मिमी

एल निनोमुळे मान्सूनचे आगमन उशिरा

यंदा मान्सून ११ जून रोजी मुंबईत दाखल होण्याची अपेक्षा होती. मात्र, एल निनो या जागतिक हवामान घटनेमुळे वाऱ्यांच्या आणि वातावरणातील बदलांवर परिणाम झाला. त्यामुळे मान्सूनचे आगमन उशिरा झाले असून मार्चपासून मुंबईसह अनेक शहरांमध्ये उकाडा आणि दमट हवामानाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT