मुंबईकर कचरा समस्यांनी त्रस्तच; दर शनिवारी झाडाझडती  pudhari photo
मुंबई

Mumbai garbage problem : मुंबईकर कचरा समस्यांनी त्रस्तच; दर शनिवारी झाडाझडती

तीन महिन्यांत 6 हजार तक्रारी; आता साहाय्यक आयुक्तांच्या खांद्यावर जबाबदारी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी महापालिका स्वच्छतेची प्रभावीपणे अंमलबजावणी करीत असल्याचा दावा करीत असली तरी मुंबईकर दैनंदिन कचरा समस्यांनी त्रस्त आहेत. महापालिकेच्या हेल्पलाईन व समाजमाध्यमांवर जानेवारी ते मार्च 2026 या काळात सुमारे सहा हजार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

दरम्यान महापालिकेने मुंबईकरांच्या तक्रारींची दखल घेत आपल्या प्रभागातील कचऱ्या संदर्भात तक्रारींचे निवारण करण्याची जबाबदारी संबंधित सहाय्यक आयुक्तांच्या खांद्यावर टाकली आहे. तर दर शनिवारी या तक्रारींची झाडाझडती पालिका आयुक्त अश्विनी भिडे घेणार आहेत.

मुंबईची लोकसंख्या दीड कोटींच्या घरात पोहोचली आहे. मुंबईतून दररोज 7 हजार मेट्रिक टन कचरा जमा होतो. जमा होणाऱ्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने कांजूर व देवनार डम्पिंग ग्राऊंडवर विल्हेवाट लावली जाते. वॉररुमच्या माध्यमातून मुंबईतील स्वच्छतेवर नजर ठेवली जात आहे. तरीही मुंबईकरांनी कचऱ्यासंदर्भात तक्रार करावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले होते. पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईकरांनी तीन महिन्यांत तब्बल 5 हजार 935 तक्रारी केल्या आहेत. यावरून मुंबईतील कचऱ्याची समस्या दूर झालेली नाही, असे स्पष्ट होते.

तक्रारींचे स्वरूप असेे

1916 या हेल्पलाईन यासह समाजमाध्यमातून मुंबईकरांनी तक्रारी केल्या आहेत. यात 1 हजार 967 म्हणजेच 33.4 टक्के तक्रारी या सफाई कामगारांकडून कचरा न उचलणे, गल्लाबोळातील सफाई न होणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा करणे इत्यादीविषयी आहेत. त्यानंतर बांधकामांसंदर्भातील कचरा व अन्य साहित्य इतस्तत: रस्त्यावर टाकणे, डेब्रिज टाकणे इत्यादीसंदर्भातील 360 तक्रारी आहेत. सांडपाणी व्यवस्था, मॅनहोलसंदर्भातील 313 तक्रारीही केल्या आहेत. एकूण तक्रारींपैकी 2 हजार 613 तक्रारी या स्वच्छताविषयक नसून अन्य तक्रारी असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT