मुंबई : पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत मुंबईकरांनी आपल्या लाडक्या बाप्पाला शनिवारी अत्यंत जड अंत:करणाने भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. यावेळी गिरगाव, जुहू, वर्सोवा चौपाटीसह व विविध विसर्जनस्थळी लाखो भक्तांचा अक्षरशः महासागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले.  (छाया : दीपक साळवी)
मुंबई

Mumbai Ganesh Visarjan : बाप्पाला भावपूर्ण निरोप!

गिरगाव, जुहू, वर्सोवा चौपाटीवर उसळला लाखो भक्तांचा महासागर

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : “गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया...”च्या जयघोषात लाखो मुंबईकरांनी आपल्या लाडक्या बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण देत, शनिवारी भावपूर्ण निरोप दिला. यावेळी गिरगाव चौपाटीसह जुहू, वर्सोवा व विविध विसर्जनस्थळी लाखो भक्तांचा महासागर उसळला होता. सकाळी 10 वाजल्यापासूनच लालबागच्या राजासह मुंबईचा राजा व अन्य सार्वजनिक मंडळांचे गणपती बाप्पा विसर्जनासाठी रवाना झाले.

भक्तांनी अकरा दिवस केलेली सेवा स्वीकारून, बाप्पाने शनिवारी आपल्या गावाकडे प्रस्थान केले. शनिवारी मुंबई शहर व उपनगरात सकाळपासूनच जल्लोषाचे वातावरण होते. मुंबईसह आजूबाजूच्या भागांतून आलेल्या भक्तांनी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लालबाग व मोठ्या गणेशमूर्ती जाणार्‍या मार्गांसह विसर्जनस्थळी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे विसर्जन स्थळाकडे जाणार्‍या रस्त्यांसह गिरगाव, जुहू, दादर, गोराई आदी चौपाटी व अन्य विसर्जनस्थळी लाखो भक्तांचा अक्षरशः महासागर लोटला होता. “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया..” असा जयघोष करत, वाद्यांच्या गजरामध्ये रस्त्यांवरून निघालेल्या मिरवणुका, रस्त्यांवर ठिकठिकाणी गणरायावर होणारी पुष्पवृष्टी यामुळे संपूर्ण मुंबई शहर भक्तिमय होऊन गेले होते.

शहरात ठिकठिकाणी उभारलेल्या नियंत्रण कक्षांद्वारे गणेशभक्तांना मुंबई महानगरपालिका व पोलिसांकडून विविध सूचना करण्यात येत होत्या. हा विसर्जन सोहळा विनाविघ्न पार पडावा यासाठी पोलिसांचाही कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुंबईतील चौपाट्यांसह नैसर्गिक स्थळे आणि 290 पेक्षा जास्त कृत्रिम तलावांमध्ये बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT