Mumbai Ganpati Visarjan 2026 Live: File Photo
मुंबई

Mumbai Ganpati Visarjan 2026 : भक्‍तिपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप

मोहन कारंडे

ढोल-ताशांचा गजर, ‘गणपती निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला ’ घोषणांचा गजर, तरुणांचा अमाप उत्साह, भाविकांच्या मनात दाटलेली हुरहुर अशा वातावरणात विघ्नहर्ता गणरायाला राज्यात निरोप देण्यात आला. पुण्यात मानाच्या कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीने पुण्याच्या दिमाखदार सोहळ्याची सुरुवात झाली. मुंबईसह राज्यात ‘श्रीं’च्या विसर्जन सोहळ्यासाठी जणू सारी जनता रस्त्यावर उतरली होती.

पुण्यात मानाच्या पाचही गणपतींच्या मिरवणुकीनंतर विसर्जन सोहळ्याला सुरुवात झाली. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता गणेशभक्तांच्या अमाप गर्दीने भरून गेले होते. विविध संस्थांच्या रांगोळ्या, फुलांची उधळण आणि ढोल-ताशांच्या निनादात ताल धरत गणरायाच्‍या होणार्‍या जयजयकाराने असमंत दुमदूमून गेला होता.

दहा दिवसांच्या उत्साही आणि भक्‍तिमय पाहुणचारानंतर लाडक्या गणरायाला संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ या एकाच जयघोषाने राज्याची प्रमुख शहरे दुमदुमून गेली होती.

मुंबईत अथांग जनसागर

मुंबईतील लालबाग, परळ आणि गिरगाव चौपाटी परिसरात विसर्जनासाठी अथांग जनसागर लोटला होता. ‘लालबागचा राजा’ आणि ‘तेजुकाया’ यांच्यासह प्रमुख मानाच्या गणपतींची मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. गिरगाव, जुहू आणि दादर चौपाटीवर महापालिका आणि नौदलाच्या मदतीने विसर्जनाची चोख व्यवस्था करण्यात आली होती.

नागपूर, नाशिक, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथेही गुलाल-फुलांची उधळण करत कृत्रिम तलावांमध्ये बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. संपूर्ण राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात होता. डोळ्यांत आनंदाश्रू आणि ओठांवर बाप्पाचे नाव घेत भाविकांनी आपल्या लाडक्या विघ्नहर्त्याला निरोप दिला.

तेजुकाय विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर पोहोचला आहे.

नाशिकमध्ये भाजपच्या नगरसेवकाच्या मंडळाकडून डीजेचा दणदणाट

नाशिकमध्ये भाजपच्या नगरसेवकाच्या मित्रमंडळाकडून डीजेचा दणदणाट सुरू आहे. भाजप नगरसेवक शाहू खैरेंच्या रोकडोबा मित्रमंडळाने मिरवणुकीत डीजेचा वापर केला आहे. डीजे दणदणाट लावून नियमांचे उल्लंघन केल्यास पोलीस कारवाई करण्याची शक्यता आहे. दुपार पर्यंत कोणत्याही गणेश मंडळांनी डीजेचा वापर केला नव्हता.

काळा चौकीचा महागणपती गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी दाखल झाला आहे.

मुंबईतील गणेश विसर्जन शांततेत; दुपारी १२ वाजेपर्यंत ४३० मूर्तींचे विसर्जन

आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईत गणेश विसर्जनाला सुरुवात झाली आहे.

दुपारी १२ वाजेपर्यंतच्या प्राप्त अहवालानुसार

सार्वजनिक - ०८

घरगुती - ४१६

गौरी / हरतालिका - ०६

एकूण = ४३० मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे.

विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

लालबागचा राजा प्रवेशद्वारातून बाहेर

परळचा राजा भारतमाताला पोहचला

या गणेशोत्सवात ज्या balancing मुर्तीची चर्चा रंगली ती मुर्ती म्हणजेचं परळचा महाराजांची; त्याच बाप्पाची आता विसर्जन मिरवणूक सुरू आहे. आता तो परळच्या भारतमाताला पोहचला आहे.

मुंबई वाहतूक पोलिसांची सूचना

गणेशोत्सव विसर्जनामुळे दि. 25/09/2026 रोजी सकाळी 11:00 ते 26/09/2026 सकाळी 8:00 पर्यंत अवजड व खाजगी बस (अत्यावशक सेवा वाहने वगळून)यांना मुंबई मध्ये प्रवेश करण्यास मनाई राहील.

ढोल पथक पोलिसांनी माघारी पाठवले

नाशिक महानगरपालिका विसर्जन मिरवणुकीत ढोल पथक पोलिसांनी माघारी पाठवले. 1 ढोल पथकाला परवानगी असताना नाशिक महापालिकेने 3 ढोल पथक मिरवणुकीत सहभागी करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे आदेश.

नाशिकच्या सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

पालकमंत्री गिरीश महाजन पुणेरी पगडी घालून केलं स्वागत.

महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे, आमदार देवयानी फरांदे उपस्थित.

मानाचा पहिल्या नाशिक मनपाच्या गणरायाची आरती करून मिरवणुकीला सुरुवात.

वाजत गाजत आज गणरायाला दिला जाणार भक्तीमय वातावरणात निरोप.

नागपूरच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरवात

तुळशीबाग येथील बाप्पाच्या मंडपातून नागपूरचा राजाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे. यंदा डीजे वर निर्बंध असल्याने विसर्जन मिरवणुकीत डीजे चा वापर नाही. पारंपरिक बँड-बाजाच्या तालात विसर्जन मिरवणूक काढण्यात येत आहे. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी बाप्पाचे भाविक स्वागत करतात.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी ११ वाजता ठाण्यातील टेंभी नाका येथे मंडप पूजन सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते पुण्याला नाना पाटेकर यांच्या गणपतीच्या दर्शनासाठी जाणार आहेत.

लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ

परळचा राजा विसर्जन मिरवणुकीला सुरूवात

लालबागच्या राजाच्या मंडपात कोळी बॅन्डच वादन, भक्तांचा जल्लोष 

बोरिवली पूर्व येथील उपनगरचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ

मुंबईतील बोरिवली पूर्व येथील उपनगरचा राजा आता विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. गणरायाला मंडपातून बाहेर काढताच भक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे. मोठ्या संख्येने गणेशभक्त बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. गोराई येथे बाप्पाचे विसर्जन करण्यात येणार आहे.

नागपूरच्या राजाला आज अखेरचा निरोप

नागपूरचा मानाचा गणपती असलेल्या नागपूरच्या राजाला आज अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. विधीवत पूजा आरती करून ढोल ताशाच्या गजरात शहरात भव्य मिरवणूक काढून करण्यात येणार आहे.

मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू

आपल्या लाडक्या बापाच्या विसर्जन सोहळ्यासाठी आता मुंबापुरी सज्ज झाली आहे. गिरगाव चौपाटी येथे प्रशासनाने खबरदारी घेत विसर्जन सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे.

चिंचपोकळीच्या चिंतामणीची सकाळी १० वाजता विसर्जन मिरवणूक

मुंबईच्या राजाची मिरवणुकीपूर्वीच्या आरतीला सुरवात झाली आहे. आरतीनंतर राजा विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्त होईल.

लालबागच्या राजाची ९ वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

मुंबईचा मानाचा आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाला आज निरोप दिला जाणार आहे. सकाळी ९ वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार असून, सकाळी १० वाजता लालबागच्या राजाची विधिवत पूजा होणार आहे. उत्तर पूजेनंतर दुपारी १२ वाजता राजेशाही विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. दुपारी १ वाजता मुख्य प्रवेशद्वारावर मुंबई पोलिसांना विशेष सलामी दिली जाणार आहे.

Mumbai Ganpati Visarjan 2026 Live:

मुंबई : तब्बल १२ दिवस सुरू असणाऱ्या गणेशोत्सवाची सांगता आज अनंत चतुर्दशीला सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनाने होत आहे. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...' अशा जयघोषासह पारंपरिक वाद्ये, साऊंड सिस्टीमचा दणदणाट व लेसर लाईटस्च्या झगमगटात निघणाऱ्या मिरवणुकांची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT