मुंबई : कर्जासह नोकरीच्या आमिषाने एका जोडप्याला गंडा घालणार्या समीर प्रकाश चुंडमुंग या भामट्याला मरिनड्राईव्ह पोलिसांनी अटक केली. अशा प्रकारेचे इतर गुन्हे केल्याची शक्यता असल्याचे तपास अधिकारी जितेंद्र कोळी यांनी सांगितले.
आरोपीची तक्रारदाराशी आकाशवाणी आमदार निवासमधील कॅण्टीनमध्ये ओळख झाली होती. या ओळखीतून त्याने तो चेंबूर येथे राहत असून इस्टेट एजंटचे काम करत असल्याचे सांगितले होते. त्याने तक्रारदाराच्या पत्नीला मुख्यमंत्री सहायता निधीतून दहा लाखांचे कर्ज देण्याचे तसेच त्यांच्या मावशीच्या मुलाला मुंबई-नागपूर सुरु होणार्या वंदे मातरम ट्रेनमध्ये टीसी म्हणन नोकरीचे आश्वासन दिले होते. नोकरीसाठी 50 हजार आणि नोकरीसाठी 8 लाख 32 हजार रुपये दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांच्या पत्नीला कर्ज मिळवून दिले नाही किंवा मावशीच्या मुलाला नोकरी दिली नव्हती. विचारणा केल्यानंतर तो टोलवाटोलवी करत होता.
याप्रकरणी गुन्हा दाखल होताच मरिनड्राईव्ह पोलिसांनी तपास सुरु केला होता. आरोपीचा शोध सुरू असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बागुल यांच्या पथकातील एपीआय जितेंद्र कोळी, उपनिरीक्षक रंगारी व अन्य पोलीस पथकाने समीर चुंडमुंगे याला अटक केली. चौकशीत त्यानेच तक्रारदाराची फसवणूक केल्याचे उघडकीस आले होते. अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.