मुंबई : मुंबईत विदेशी पर्यटक महिलांची टॅक्सीचालकांकडून लूट झाल्याचे प्रकार ताजा असताना आता सेल्फीसाठी एका विदेशी महिलेचा पाठलाग करुन तिचा छळ केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गुलशनकुमार नरेश शर्मा आणि मनसुखकुमार चंदकिशोर शर्मा या दोन आरोपी तरुणांना आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली आहे. ते दोघेही मूळचे बिहारचे रहिवाशी आहेत.
इनेस फारिया ही महिला यूट्यूबर असून ती सध्या टुरिस्ट व्हिसावर भारतात आली होती. गेल्या आठवड्यात ती दक्षिण मुंबईत फिरण्यासाठी आली होती. तेथून ती महालक्ष्मी येथील घोबीघाट, सातरस्ता परिसरात आली. यावेळी तिला भरस्त्यात आलेल्या अनुभवाचा व्हिडीओ तिने सोशल मिडीयावर शेअर केला होता. त्यात तिने सातरस्ता, धोबीघाट परिसरात फिरत असताना दोन तरुणांनी तिच्यासोबत सेल्फीसाठी दबाब
आणण्याचा प्रयत्न केला. तिने त्यांना नकार दिला होता, तरीही ते दोघेही तिचा पंधरा ते वीस मिनिटे पाठलाग करत होते. या भयानक अनुभवाने तिला प्रचंड मानसिक धक्का बसल्याचे नमूद केले होते. तिचा सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल होताच त्याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली होती. आग्रीपाडा पोलिसांनी संबंधित दोन्ही तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्यांना तब्यात घेतले आहे.
मलबार हिल येथून गुलशनकुमार तर बिहारला पळून गेलेल्या मनसुखकुमारला त्याच्या गावाहून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच या विदेशी महिलेचा सेल्फीसाठी पाठलाग करुन तिच्याशी असभ्य वर्तन केल्याचे उघडकीस आले होते. आरोपी मलबार हिल येथील एका बांधकाम साईटवर काम करत असून गुन्हा घडल्यानंतर मनसुखकुमार हा त्याच्या गावी पळून गेला होता.