IAS Tukaram Mundhe  File Photo
मुंबई

Tukaram Mundhe : फाईव्ह स्टार असो वा स्ट्रीट फूड, नियम तोडाल तर कारवाई!

अन्‍न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : सर्वांसाठी कायदा सारखाच असून अन्‍न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. आस्थापना पंचतारांकित हॉटेल असो किंवा रस्त्यावरील स्ट्रीट फूड. नियम मोडल्यास थेट कारवाई केली जाईल, असा इशारा अन्‍न व ‍ औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

मुंबई प्रेस क्लबमध्ये वार्तालापप्रसंगी ते बोलत होते.अन्‍न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांना आतापर्यंत ७०० हून अधिक नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यापैकी सुमारे १०० आस्थापनांनी अपील केले आहे, असे ते म्हणाले.वर्षभरातील सर्व प्रमुख सणांचे कॅलेंडर तयार करण्यात आले असून त्यानुसार तपासणीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आल्याचे ते म्हणाले.

महाप्रसादालाही नियम लागू

गणेश मंडळांच्या भंडारा अथवा महाप्रसादासाठीही अन्‍न सुरक्षा नियम लागू आहेत. हा कोणताही नवीन नियम नाही, तर अन्‍न व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक घटकाकडे याबाबतचा परवाना असणे बंधनकारक आहे.

शाळांभोवती ५० मीटरमध्येखाद्यपदार्थ विक्री बंदी

शाळांपासून ५० मीटरच्या परिसरात काही खाद्यपदार्थांच्या विक्रीवर निर्बंध घालणाऱ्या नियमांची अंमलबजावणी शाळांमध्ये सुरू झाली आहे.

जेनेरिक औषधांवरही नजर

जेनेरिक औषधांच्या दर्जाबाबत तक्रारी आल्यास त्यांची तपासणी केली जाईल. औषध डॉक्टरांनी कोणते लिहावे, याबाबत आपण भाष्य करू शकत नाही, असेही ते म्हणाले.

रक्तपेढ्यांना नियमांचे पालन बंधनकारक

रक्त हे औषध म्हणून वर्गीकृत असल्याने रक्त संकलन, तपासणी आणि त्याची नोंद याबाबत निर्धारित मानकांचे पालन आवश्यक आहे. केवळ परवानाधारक संस्थांनाच रक्तदान शिबिरे आयोजित करता येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हे उंदीर आमचेच

एका खाद्य आस्थापनाच्या तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणात उंदीर आढळले. त्यावर संबंधित मालकाने हे आमचेच उंदीर आहेत, असे ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांना सांगितले. अशाप्रकारची कारणे प्रशासन अजिबात स्वीकारणार नाही, असा टोला मुंढे यांनी लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT