Mumbai Goregaon Building Fire Pudhari
मुंबई

Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! गोरेगावच्या 45 मजली इमारतीला भीषण आग; VIDEO

Mumbai Goregaon Building Fire: मुंबईच्या गोरेगाव पूर्व भागातील 45 मजली डीबी वूड्स इमारतीला सकाळी आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. नवव्या मजल्यावरील एका फ्लॅटच्या बेडरूममध्ये ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Rahul Shelke

Mumbai Goregaon Building Fire: मुंबईत आज सकाळी आगीची घटना घडली आहे. गोरेगाव पूर्व परिसरात असलेल्या डीबी वुड्स टॉवर या उंच इमारतीला अचानक आग लागली. तब्बल 45 मजली असलेल्या या इमारतीच्या नवव्या मजल्यावरील एका फ्लॅटमधून दाट धुराचे लोट बाहेर येताना दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

प्रत्यक्षदर्शींनुसार, सकाळच्या सुमारास अचानक धूर दिसू लागल्यानंतर रहिवाशांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. सकाळी 9 वाजून 11 मिनिटांनी आग लागल्याचा पहिला कॉल आला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता 9 वाजून 25 मिनिटांनी आगीला लेव्हल-1 घोषित करण्यात आले.

आग लागलेला फ्लॅट नवव्या मजल्यावर असून प्राथमिक माहितीनुसार बेडरूममध्ये आग लागल्याचे समोर आले आहे. सुरुवातीच्या अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना घडली असावी, मात्र अधिकृत कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, संभाव्य धोका लक्षात घेऊन इमारतीतील रहिवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले. अनेक नागरिकांना इमारतीच्या रेफ्यूजी एरियामध्ये सुरक्षितपणे हलवण्यात आले. काही जणांना धुराचा त्रास जाणवल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.

अग्निशमन दलाच्या जवानांनी वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. पाण्याचा मारा सुरू करताच हळूहळू आगीची तीव्रता कमी झाली. काही वेळ धूर पसरल्यामुळे दृश्यता कमी झाली होती, तरीही जवानांनी संयम राखत परिस्थिती हाताळली.

या घटनेमुळे सकाळच्या वेळेत परिसरातील वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला. पोलिसांनी रस्ता मोकळा ठेवत बचावकार्य केले. प्रशासनाकडून इमारतीची विद्युत व्यवस्था तात्पुरती बंद करण्यात आली असून संपूर्ण इमारतीची तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू असून अग्निशमन दल आणि संबंधित यंत्रणा चौकशी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT