मुंबई : फेरीवाला मुक्त मुंबईसाठी महापालिकेने फेरीवाला हटाव मोहीम हाती घेतली आहे. पण या मोहिमेचा भाजपलाच पुळका आला आहे. ही मोहीम अन्यायकारक असल्याचे सांगत भाजपाचे माजी नगरसेवक उपमहापौर यांनी 15 जुलैला थेट मंत्रालयावर मूक मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मुंबईकरांवर भाजपा शिवसेना.. अजब तुझे सरकार, म्हणायची वेळ आली आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असलेल्या मुंबईच्या सौंदर्यात फेरीवाल्यांनी बाधा आणली आहे. फेरीवाल्यांमुळे सर्वसामान्य मुंबईकरांना चालणेही मुश्किल झाले आहे. संपूर्ण मुंबईत फेरीवाल्यांची संख्या सुमारे साडेतीन लाखाच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईच्या सौंदर्यात बाधा येत आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेने गेल्या काही दिवसापासून फेरीवाला हटाव मोहीम हाती घेतली आहे. पण या मोहिमे विरोधात आता राज्यातील सत्ताधारी भाजपाचे माजी नगरसेवक बाबुभाई भवानजी यांनी 15 जुलैला मंत्रालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.
संयुक्त फेरीवाला संघटना असोसिएशन या संघटनेतर्फे दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथून मंत्रालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी पोलिसांना दिलेल्या निवेदनामध्ये असोसिएशनचे संस्थापक भाजपाची सक्रिय कार्यकर्ते संजय यादवराव यांनी मुंबई महानगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून गेल्या काही महिन्यांपासून आमच्या फेरीवाला बांधवांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे. अनेक वर्षांपासून आपला रोजगार रस्त्यावर उभा करणार्या फेरीवाल्यांना अडवले जात आहे. यामुळे हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह संकटात आला आहे. गेली 3 महिने व्यवसाय बंद असल्यामुळे मुलांची शाळेची फी भरायला पैसे नाहीत. घरात जेवायला अन्न नाही. आम्हाला दोन रुपये किलो तांदूळ नको, पण स्वाभिमानाने जगू द्या, हेच आमचे म्हणणे आहे. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी फेरीवाल्यांना स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देतात आणि महापालिका, पोलीस आम्हाला सन्मानाने व्यवसाय करु देत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.