FDA Pudhari
मुंबई

FDA Action: मुंबईतील तीन नामांकित हॉटेलांचे अन्न परवाने निलंबित; एफडीएची धडक कारवाई

भेंडीबाजारमधील शालिमार हॉटेल, नूर मोहम्मदी हॉटेल आणि उमरखाडीतील रहमानिया

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: अन्नसुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईतील तीन नामांकित हॉटेलांचे अन्न परवाने निलंबित केले आहेत. भेंडीबाजारमधील शालिमार हॉटेल, नूर मोहम्मदी हॉटेल आणि उमरखाडीतील रहमानिया रेस्टॉरंटमध्ये झालेल्या तपासणीत स्वच्छता व अन्नसुरक्षेतील गंभीर त्रुटी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली.

एफडीएने शालिमार हॉटेलची एप्रिलमध्ये तपासणी करून सुधारणा नोटीस बजावली होती. मात्र, १३ जुलै रोजी झालेल्या पुनर्तपासणीत तब्बल २५ गंभीर त्रुटी कायम असल्याचे आढळले. स्वयंपाकघरातील अस्वच्छता, कच्च्या मालाच्या नोंदींचा अभाव, पिण्याच्या पाण्याच्या चाचण्या न करणे, खाद्यतेलाच्या गुणवत्तेच्या नोंदी नसणे, शाकाहारी व मांसाहारी अन्नासाठी स्वतंत्र व्यवस्था नसणे आणि कीटकप्रतिबंधक जाळ्यांचा अभाव अशा त्रुटींमुळे १४ जुलैपासून हॉटेलचा परवाना निलंबित करण्यात आला.

नूर मोहम्मदी हॉटेलच्या तपासणीत स्वयंपाकघरात काळ्या तेलाचे थर, माशा व कावळ्यांचा मुक्त प्रवेश, अस्वच्छ भांडी, कच्च्या मालाची अयोग्य साठवण, पिण्याच्या पाण्याच्या तपासणीचा अभाव आणि कीटक नियंत्रणासाठी अपुरी व्यवस्था आढळून आली. त्यामुळे या हॉटेलचाही परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला.

उमरखाडीतील रहमानिया रेस्टॉरंटमध्ये अन्नपदार्थ व रसायनांची अयोग्य साठवण, गंजलेली उपकरणे, भिंती-छतांची दुरवस्था, पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेच्या चाचण्या न करणे आणि अन्नसुरक्षेच्या नोंदींचा अभाव आढळल्याने या रेस्टॉरंटचा परवानाही निलंबित करण्यात आला.

ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही खाद्य व्यावसायिकाविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT