मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभर राबविलेल्या विशेष तपासणी मोहिमेत मुंबईतील पाच नामांकित क्लबच्या एफएसएसएआय परवान्यांचे तात्काळ निलंबन केले आहे. स्वच्छता, अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आणि अस्वच्छ परिस्थिती आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.
राज्यभरात ८१ हॉटेल, रेस्टॉरंट, धाबे व इतर आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून ११ परवाने निलंबित, १२ सुधारणा नोटिसा आणि एकूण १.०४ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आला.
मुंबईत द क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय), आर. के. जुहू जिमखाना, द अपर्णा जुहू जिमखाना, एमआयजी क्रिकेट क्लब (वांद्रे पूर्व) आणि द विलिंग्डन स्पोर्ट्स क्लब या पाच क्लबवर कारवाई करण्यात आली.
तपासणीत स्वयंपाकघरातील अस्वच्छता, झुरळे व माशांचा प्रादुर्भाव, कच्चे व शिजवलेले अन्न एकत्र साठवणे, मुदतबाह्य अन्नपदार्थ, अपुरी तापमान व्यवस्था, अन्न हाताळणीतील निष्काळजीपणा आणि आवश्यक नोंदींचा अभाव अशा गंभीर त्रुटी आढळल्या.
याशिवाय, फोर्ट येथील पूर्णिमा रेस्टॉरंटचा एफएसएसएआय परवानाही निलंबित करण्यात आला. तपासणीत बुरशी लागलेल्या भाज्या, अस्वच्छ स्वयंपाकघर, माशांचा प्रादुर्भाव, निकृष्ट साठवणूक आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय नोंदींचा अभाव आढळल्याचे एफडीएने नमूद केले.
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्न व्यवसायिकांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या मोहिमेचा भाग म्हणून मुंबईतील इतर अनेक खाद्य आस्थापनांवरही अलीकडच्या काळात कारवाई करण्यात आली आहे.