Mumbai FDA Action pudhari photo
मुंबई

Mumbai FDA Action : मुंबईत डॉमिनोजसह १७ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

एफडीएची कारवाई; कांदिवली परिसरातील चार आस्थापनांना १.३० लाखांचा दंड

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : अन्न सुरक्षेच्या गंभीर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी, महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने परळमधील डोमिनोज पिझ्झा आउटलेटसह मुंबईतील तीन खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत. यामध्ये डॉमिनोज पिझ्झाच्या तीन आस्थापनांसह हॉटेल, रेस्टॉरंट, मिठाईची दुकाने आणि अन्य खाद्य व्यवसायांचा समावेश आहे. कांदिवली परिसरातील चार आस्थापनांना एकूण १ लाख ३० हजारांचा दंड ठोठावला आहे.

दरम्यान, मालाड पूर्व येथे प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री आणि साठवणूक केल्याप्रकरणी ९ हजार ९३० रुपयांचा साठा जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये गोवंडीतील अमीना हॉटेल, कांदिवली पश्चिमेतील आशिर्वाद सुपर स्टोअर, परळ, मरोळ आणि बोरिवली पश्चिम येथील डॉमिनोज पिझ्झाची तीन आस्थापने, शिवडीतील थँक्सगिव्हिंग पॅटिसरी अँड कन्फेक्शनरी, मालाड पश्चिमेतील स्वीट नाइफ रेस्टो, जुहूतील जय कल्याण कॅन्टीन, सांताक्रूझ पश्चिमेतील कार्निव्हल बाय ट्रेसिंड आणि खार पश्चिमेतील राजस्थान रेस्टॉरंट यांचा समावेश आहे.

बनारसी हिंदू हॉटेल, कविता केटरर्स, अथर्व युनिव्हर्सिटी कॅन्टीन आणि जायका किंग शावरमा या चार आस्थापनांना १ लाख ३० हजारांचा दंड ठोठावला. अंधेरी पश्चिमेतील दार्जिलिंग लेपचा मोमोज, खार पश्चिमेतील हुंडो पिझ्झा, वर्सोव्यातील साहिल हॉटेल, वांद्रे पश्चिमेतील द पेनांग टेबल, अंधेरी पश्चिमेतील तृप्ती फरसाण अँड स्वीट्स, धारावीतील हॉटेल थेरेसा आणि लोअर परळ येथील इन्स्टाकार्ट सर्व्हिसेस या आस्थापनांवरही कारवाई करण्यात आली आहे.

हॉटेल थेरेसाची नोंदणी निलंबित करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान काही आस्थापनांमध्ये झुरळे आणि अन्य कीटकांचा प्रादुर्भाव, उंदरांनी कुरतडलेली अन्नपदार्थांची पाकिटे तसेच प्रभावी कीटकनियंत्रण व्यवस्थेचा अभाव आढळला. खराब झालेले अन्नपदार्थ, जळालेले किंवा अतिवापर केलेले तेल वापरणे, कच्चे आणि शिजवलेले तसेच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ एकत्र साठवणे, अस्वच्छ फ्रिज आणि तापमानाच्या नोंदींचा अभाव अशा त्रुटीही निदर्शनास आल्या.

मालाडमध्ये प्रतिबंधित अन्नसाठा जप्त

मालाड पूर्वेतील रोहिदास नगर, कासमबाग परिसरात १३ ऑक्टोबर रोजी रात्री अशोक भडू अहिरे यांच्याकडे प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री आणि साठवणूक होत असल्याचे आढळले. अन्न सुरक्षा अधिकारी आकाश मांडले यांनी मालाड पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली. यावेळी ९ हजार ९३० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आणि आठ अनौपचारिक नमुने घेण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT