मुंबई : अन्नपदार्थांची स्वच्छता, सुरक्षित साठवणूक आणि अन्न हाताळणीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुंबईतील चार आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा बडगा उगारला आहे. खार जिमखाना, मालाडमधील नोवारा, सांताक्रूझमधील बजरंग स्वीट मार्ट आणि अंधेरीतील एएसएम हॉटेल्स अँड हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस यांच्या तपासणीत अन्नसुरक्षा व स्वच्छतेशी संबंधित गंभीर त्रुटी आढळल्या. संबंधित परवाने किंवा नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले आहे.
खार जिमखाना : १३ वा रोड, खार (पश्चिम) येथे अन्नपदार्थ, पॅकेजिंग साहित्य, रसायने आणि अन्य वस्तूंच्या साठवणुकीसाठी पुरेशी व योग्य व्यवस्था नसल्याचे आढळले. नोंदणी प्रमाणपत्र दर्शनी भागात नव्हते. अन्नपदार्थांची आवश्यक चाचणी केली जात नसल्याचेही निदर्शनास आले. स्वयंपाकघरातील अन्न तयार करण्याचा परिसर अस्वच्छ होता. कच्चे आणि तयार तसेच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ वेगळे ठेवले जात नव्हते. उपकरणांचे योग्य निर्जंतुकीकरण केले जात नव्हते.
गोठवलेल्या अन्नपदार्थांचे सुरक्षित पद्धतीने वितळवणे केले जात नव्हते. अन्नसाठ्यात आधी आलेला माल आधी वापरणे (एफआयएफओ) आणि ज्याची मुदत आधी संपते तो माल आधी वापरणे (एफईएफओ) या पद्धतींचे पालन होत नव्हते. सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांमध्ये तेलकट पदार्थ अडविणारी जाळी आणि झुरळ प्रतिबंधक सापळ्यांचीही कमतरता होती.
नोवारामध्ये १४ त्रुटी कायम : मालाड पश्चिमेतील इंजिनिअस किचन्स प्रा. लि. (नोवारा) येथे ३ जुलै रोजी झालेल्या तपासणीत त्रुटी आढळल्यानंतर सुधारणा नोटीस देण्यात आली होती. मात्र, १३ ऑगस्टच्या पुनर्तपासणीत नोटिसमधील २५ गंभीर त्रुटींपैकी १४ त्रुटींची पूर्तता झालेली नसल्याचे आढळले. स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या तेल किंवा तुपाबाबत आवश्यक माहिती देणारा फलकही लावलेला नव्हता. वारंवार सूचना देऊनही त्रुटी दूर न झाल्याने १९ ऑगस्टपासून निलंबित करण्यात आला.
बजरंग स्वीट मार्ट : सांताक्रुझ पश्चिमेतील बजरंग स्वीट मार्टची १९ ऑगस्ट रोजी तपासणी करण्यात आली. अन्नसुरक्षा निकषांच्या तपासणीत आस्थापनाला ८६ पैकी केवळ ४० गुण, म्हणजे ४७ टक्के अनुपालन मिळाले.
आस्थापनात एफएसएसएआय परवाना दर्शनी भागात लावलेला नव्हता. भिंती, छत आणि इतर ठिकाणचा रंग व प्लास्टर उखडलेले होते. फरशीची स्थितीही अन्नसुरक्षा निकषांनुसार नव्हती. काही उपकरणे व डबे गंजलेले, तर काही फरशा तुटलेल्या आढळल्या.
वापरातील पिण्याच्या पाण्याची निर्धारित मानकांनुसार तपासणी झाल्याच्या नोंदी नव्हत्या. कच्च्या मालासाठी पुरेशी साठवणूक व्यवस्था नव्हती. कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक स्वच्छतेच्या सुविधांमध्ये त्रुटी होत्या. अन्नपदार्थांच्या प्रयोगशाळा तपासणीच्या नोंदीही उपलब्ध नव्हत्या.
कच्चे, शिजविलेले, शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचे योग्य विभाजन केले जात नव्हते. उपकरणांचे योग्य निर्जंतुकीकरण होत नसल्याचेही आढळले.या गंभीर त्रुटींप्रकरणी एफडीएकडून नियमानुसार परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
एएसएम हॉटेल्समध्ये स्वच्छता निकषांचा भंग
अंधेरी पश्चिमेतील एम. एस.एम. हॉटेल्स अँड हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस प्रा. लि. येथे २० ऑगस्ट रोजी तपासणी करण्यात आली. एसव्हीपी नगर, म्हाडा वसाहत परिसरातील या आस्थापनात अन्नसुरक्षा व स्वच्छतेच्या निर्धारित निकषांचे पालन होत नसल्याचे आढळले.
विशेषतः अन्न सुरक्षा व मानकांच्या नियमांमधील अनुसूची-४ अंतर्गत अन्न हाताळणी, साठवणूक, स्वच्छता आणि परिसराच्या देखभालीसंबंधी नियमांचे उल्लंघन निदर्शनास आले. गंभीर त्रुटींची दखल घेत संबंधित आस्थापनाचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला.
निलंबनाच्या काळात संबंधित चारही आस्थापनांना आदेशानुसार अन्नपदार्थांची खरेदी, उत्पादन, साठवणूक, विक्री किंवा वितरण करता येणार नाही. आदेशाचे उल्लंघन करून व्यवसाय सुरू ठेवल्यास अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा एफडीएने दिला आहे.