मुंबई: अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि कॅन्टीनविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईत धडक कारवाई करत दादरच्या इट निनोसह चार हॉटेलांचे परवाने निलंबित केले.
४ ते ६ ऑगस्टदरम्यान बृहन्मुंबईत १० आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यापैकी पाच आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या. एका आस्थापनेला सुधारणा नोटीस बजावण्यात आली.
तपासणीदरम्यान अस्वच्छ स्वयंपाकघर, झुरळे व माश्यांचा प्रादुर्भाव, अन्नाची अयोग्य साठवणूक, गंजलेली उपकरणे, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणी व प्रशिक्षणाच्या नोंदींचा अभाव, तसेच आवश्यक स्वच्छता नियमांचे पालन न केल्याचे प्रकार आढळले.
दादर येथील इट निनो प्रायव्हेट लिमिटेडमध्ये अस्वच्छता, घरमाश्यांचा वावर, कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव आणि अन्न व पिण्याच्या पाण्याच्या चाचण्यांच्या नोंदी नसल्याने परवाना निलंबित करण्यात आला.
अंधेरीतील जय मा काली धाबा येथे शौचालयालगत अन्नसाठा, गंजलेल्या रॅक आणि उघड्या कणकेवर माश्या आढळल्याने कारवाई झाली.
सांताक्रूझ येथील ए जे हाॅस्पिटॅलिटी मध्ये मोठ्या प्रमाणात झुरळांचा प्रादुर्भाव, वर्तमानपत्रातून अन्नपॅकिंग आणि गंजलेली स्वयंपाकाची उपकरणे आढळली. कुर्ल्यातील साऊथ इंडियन डोसा काॅनरमध्ये स्वच्छता, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण व आवश्यक नोंदींच्या त्रुटींमुळे परवाना निलंबित करण्यात आला.
प्रतिबंधित पानमसाला, गुटखा आदींविरोधातही मुंबईत कारवाई करण्यात आली. एका आस्थापनेतून ६५ हजार २३६ रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करून एफआयआर दाखल करण्यात आला आणि एका व्यक्तीला अटक करण्यात आली. नागरिकांनी अन्नाच्या दर्जाबाबत तक्रार असल्यास एफडीएच्या टोल-फ्री क्रमांकावर किंवा संबंधित तक्रार पोर्टलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.