FDA Action Pudhari File Photo
मुंबई

Mumbai FDA Action: मुंबईतील १० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित; उंदीर-झुरळांसह अस्वच्छता आढळली

स्विगी इन्स्टामार्ट, सुलेमान उस्मान मिठाईवाला, भेलपुरी हाऊससह १० आस्थापनांवर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: सणासुदीच्या काळात नागरिकांच्या ताटात सुरक्षित अन्न पोहोचावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईत धडक तपासणी मोहीम राबविली. १७ ते २० सप्टेंबरदरम्यान केलेल्या तपासणीत स्वच्छतेचा अभाव, उंदरांचा वावर, झुरळे, माश्यांचा प्रादुर्भाव तसेच अन्नपदार्थांच्या साठवणुकीतील गंभीर त्रुटी आढळल्याने मुंबईतील १० खाद्य आस्थापनांचे परवाने अथवा नोंदणी प्रमाणपत्रे निलंबित करण्यात आली आहेत.

या कारवाईत मोहम्मद अली रोडवरील सुमारे ९० वर्षे जुने आणि प्रसिद्ध सुलेमान उस्मान मिठाईवाला, बॅलार्ड इस्टेट येथील स्विगी इन्स्टामार्ट, मालाड पूर्वेतील सद्गुरू स्वीट्स अँड फरसाण मार्ट, कांदिवलीतील जैन स्वीट अँड भेलपुरी हाऊस यांच्यासह विविध खाद्य आस्थापनांचा समावेश आहे.

९० वर्षे जुन्या मिठाई दुकानातही अस्वच्छता

मोहम्मद अली रोडवरील १९३६ पासून सुरू असलेल्या सुलेमान उस्मान मिठाईवाल्याच्या आस्थापनाची तपासणी केली असता अन्न तयार करणे व साठवणुकीची जागा नाले, सांडपाणी वाहिन्या आणि कचरा क्षेत्रापासून स्वतंत्र ठेवण्यासाठी आवश्यक व्यवस्था नसल्याचे आढळले.

काही नाल्या उघड्या होत्या. त्यात झुरळांपासून बचावासाठी आवश्यक सापळेही नव्हते. त्यामुळे कीटक, माश्या आणि सांडपाण्यातून येणारे रोगकारक घटक अन्नपदार्थांच्या संपर्कात येण्याचा धोका असल्याचे एफडीएने नमूद केले. तयार मिठाई तापमान आणि आर्द्रता नियंत्रण नसलेल्या ठिकाणी ठेवण्यात आल्याचेही आढळले. या गंभीर त्रुटींमुळे अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ मधील कलम ३२(३) अंतर्गत परवाना निलंबित करण्यात आला.

स्विगीच्या गोदामात उंदरांचा धुमाकूळ

बॅलार्ड इस्टेट येथील स्विगी इन्स्टामार्टच्या डार्क स्टोअरमध्ये तपासणीदरम्यान तांदळाच्या पिशव्या उंदरांनी कुरतडलेल्या आढळल्या. धान्य सांडलेले आणि उंदरांची विष्ठाही आढळली. त्याचबरोबर झुरळे, माश्या आणि मृत कीटक आढळून आले. रेफ्रिजरेशन व्यवस्थेतही अस्वच्छता असल्याचे निदर्शनास आले. गंभीर त्रुटींमुळे संबंधित परवाना निलंबित करण्यात आला.

मिठाई, फरसाण विक्रेत्यांनाही दणका

मालाड पूर्वेतील सद्गुरू स्वीट्स अँड फरसाण मार्टमध्ये अस्वच्छता, तयार मिठाईवर माश्यांचा प्रादुर्भाव, अन्नपदार्थांच्या साठवणुकीतील त्रुटी तसेच खरेदी-विक्रीच्या पावत्या आणि आवश्यक नोंदींचा अभाव आढळला. त्यामुळे नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले.

कांदिवलीतील जैन स्वीट अँड भेलपुरी हाऊसवरही अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने परवाना निलंबित करण्यात आला. कांदिवली पूर्वेतील अमेझॉनसाठी कार्यरत एका गोदामावर स्वच्छतेच्या गंभीर त्रुटींमुळे कारवाई झाली.

चेंबूरमधील नाइस एंटरप्रायझेस, घाटकोपर पूर्वेतील गो ग्रीन फूड हॉस्पिटॅलिटी, लालबाग येथील स्वाद स्नॅक्स कॉर्नर तसेच वर्सोवा-अंधेरी पश्चिमेतील लखनवी कबाब आणि झायका मुरादाबादी हॉटेलवरही अन्न सुरक्षा व स्वच्छता नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी कारवाई करण्यात आली.

राज्यभरात ३२ हजार किलो-लिटर अन्नसाठा जप्त

दरम्यान, सणासुदीच्या काळात राज्यभरात एफडीएकडून करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे ३२ हजार किलो-लिटर संशयित किंवा अस्वच्छ अन्नपदार्थ जप्त अथवा नष्ट करण्यात आले. या साठ्याची अंदाजे किंमत १ कोटी ३६ लाख २० हजार ७३५ रुपये असल्याचे प्रशासनाने सांगितले.

प्रतिबंधित पानमसाला आणि गुटख्याची विक्री व साठवणूक केल्याप्रकरणी १४ गुन्हे दाखल करून १५ जणांना अटक करण्यात आली. या कारवाईत १ कोटी ३८ लाख ७४ हजार ४३ रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT