Blood Pudhari
मुंबई

Mumbai Blood Shortage: मुंबईत रक्ताचा तुटवडा गंभीर; अनेक सरकारी रक्तपेढ्या ‌‘रेड झोन‌’मध्ये

मुंबईतील सर्वात मोठ्या रक्तपेढ्यांपैकी एक जे.जे. महानगर रक्तपेढीकडेही केवळ 204 युनिट्सचा साठा असल्याने परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित होत आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबईत रक्तसाठ्याचा गंभीर तुटवडा निर्माण झाला असून, अनेक प्रमुख शासकीय रक्तपेढ्यांमध्ये उपलब्ध रक्तसाठा धोक्याच्या पातळीवर पोहोचला आहे. थॅलेसेमिया रुग्ण, मोठ्या शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन उपचारांवर याचा थेट परिणाम होण्याची भीती आहे.

मुंबईतील सर्वात मोठ्या रक्तपेढ्यांपैकी एक जे.जे. महानगर रक्तपेढीकडेही केवळ 204 युनिट्सचा साठा असल्याने परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित होत आहे. इंडियन रेड क्रॉस, जी.टी. रुग्णालय, कामा रुग्णालय, वांद्रे भाभा रुग्णालय आणि कांदिवली शताब्दी रुग्णालयातील रक्तसाठाही मर्यादित आहे.

नायर रुग्णालयात दाखल असलेल्या 65 वर्षीय वंदना फोंडके यांच्यासाठी ‌‘ओ पॉझिटिव्ह‌’ रक्ताची तातडीने आवश्यकता आहे. होली फॅमिली रुग्णालयात मंगळवारच्या सीएबीजी शस्त्रक्रियेसाठी ‌‘ओ निगेटिव्ह‌’ पीआरबीसीच्या चार युनिट्सची तातडीची गरज आहे.

रक्तदान शिबिरांमध्ये घट, सुट्ट्यांचा कालावधी आणि नियमित रक्तदात्यांची संख्या कमी होणे यामुळे रक्तसाठ्यावर ताण वाढल्याचे रक्तपेढी क्षेत्रातील सूत्रांचे म्हणणे आहे. आता तातडीने मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरे आयोजित करण्याची मागणी होत आहे.

कुणी रक्त देता का रक्त?

  • मुंबईतील प्रमुख रक्तपेढ्यांमधील स्थिती अत्यंत चिंताजनक आहे.

  • केईएम रुग्णालयात केवळ 65 युनिट्सचा साठा उपलब्ध असून दररोजची गरज 100 ते 129 युनिट्स इतकी असते.

  • सेंट जॉर्ज रुग्णालयात फक्त 4 युनिट्स शिल्लक असल्याची माहिती आहे. या रुग्णालयात सुमारे 100 थॅलेसेमिया रुग्ण नियमित रक्तावर अवलंबून असून दररोज 10 ते 15 युनिट्सची गरज भासते.

  • सायन रुग्णालयात सुमारे 280 थॅलेसेमिया रुग्ण असूनही रक्तसाठा अपुरा असल्याचे सांगितले जात आहे.

  • नायर रुग्णालयाचा साठा आठवडाभरही टिकणार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

  • राजावाडी रुग्णालयात डीएनबी अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर रुग्णसंख्या आणि रक्ताची मागणी वाढली असून उपलब्ध साठा जास्तीत जास्त पाच दिवस पुरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT