विक्रोळी : मुंबईच्या विक्रोळी पार्कसाइट परिसरातील एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि.२७) रात्री ९ च्या सुमारास घडली. धनंजय राधेशाम मिश्रा(४७) आणि राधेश्याम माताप्रसाद पांडे (४२) अशी त्यांची नावे असून दोघांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांनाही ९० टक्क्यापेक्षा जास्त भाजल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
पार्कसाइट येथील श्री राम सोसायटी मधील एका घरात शनिवारी रात्री ९ वाजता ही दुर्घटना घडली. त्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस दाखल धाव घेऊन आग आटोक्यात आणली. त्यानंतर दोघांना जखमी अवस्थेत घराबाहेर काढले. या सिलेंडरचा स्फोट इतका भीषण होता की, घराचा काही भाग ही कोसळला आहे. इथे आग कशी लागली? सिलेंडरचा स्फोट कसा झाला? याचे कारण समोर आले नसून पोलिस आणि अग्निशमन दल याचा शोध घेत आहेत. मात्र या घटनेमुळे या विभागात खळबळ उडाली आहे.