मुंबई : अमली पदार्थाची तस्करी या घटना आता नवीन नाहीत. मात्र, तस्करीसाठी टोळ्या काय शक्कल लढवतील याची खात्री नसते. असाच एक प्रकार मुंबई विमानतळावर समोर आला आहे. कमरेवरील ऑर्थो पट्टा आणि हाताला गुंडाळलेल्या पट्ट्यामधून तब्बल 51 कोटी रुपयांच्या अमली पदार्थाची तस्करी केल्याचं समोर आलं आहे. विमानतळावरील सतर्क तपास यंत्रणांमुळे ही घटना उघडकीस आली आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून येणारा एक प्रवासी अमली पदार्थाची तस्करी करत असल्याची माहिती एअर इंटेलिजन्स युनिटला (AIU) मिळाली होती. यानुसार पथकाने विमानतळावरून एका प्रवाशाला बेड्या ठोकल्या. कंबर दुखी किंवा दुखापत झाल्यावर वापरल्या जाणाऱ्या ऑर्थो पट्ट्यात आणि हाताला बांधलेल्या पट्ट्यात लपवून कोकेनची तस्करी सुरू असल्याचे या प्रकरणातून समोर आले आहे. संबंधित आरोपीकडून तपास पथकांनी चार पॅकेट कोकेन जप्त केले यात ५१९४ ग्रॅम कोकेन होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत तब्बल ५१ कोटी ९४ लाख रुपये इतकी आहे.
आरोपी हा परदेशी नागरिक असून त्याची कसून चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अमली पदार्थाची तस्करी टोळी या मागे आहे का, टोळीचा म्होरक्या कोण याचा तपास सध्या सुरू आहे. नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉफिक सबस्टन्सेस कायद्यातील (NDPS Act) सुधारित तरतुदी अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.