मुंबई : मुंबईतील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मुखर्जी, मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आदी. Pudhari File Photo
मुंबई

Mumbai Development Projects | मुंबईतील विकास प्रकल्प 4 वर्षांत पूर्ण होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण

अरुण पाटील

मुंबई : मुंबईतील विविध भागांना जोडणारे टनेल्स, लिंक पूल आणि उड्डाणपूल हे वाहतूक सुलभीकरणासाठी उपयुक्त ठरणार आहेत. 2028-29 पर्यंत मुंबईत सुरू असलेले विकास प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

वांद्रे येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पोडियम येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते एमएमआरडीए आणि मुंबई महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी उपस्थित होते.

काही वर्षांपूर्वी आपण ‘मुंबई विदिन 59 मिनिट्स’ हे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारात असून वर्षाला किमान 50 किलोमीटरचे मेट्रो मार्ग पूर्ण होत आहेत. तसेच रस्त्यांचे जाळे चांगल्या प्रकारे उभारले जात असून वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका करणार्‍या दोन महत्त्वाच्या लिंक पुलांचे लोकार्पण करण्यात आले आहे. यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगर प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईकरांसाठी या प्रकल्पांचे लोकार्पण करताना आनंद होत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुंबईतील विविध भागांना जोडणारे टनेल्स, लिंक पूल आणि उड्डाणपूल हे वाहतूक सुलभीकरणासाठी उपयुक्त ठरणार आहेत. 2028-29 पर्यंत मुंबईत सुरू असलेले विकास प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट आहे. मुंबईचा विकास करत असताना तो पर्यावरणस्नेही असावा यासाठी आग्रही आहोत. पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून शाश्वत विकास करता येणार नाही. त्यामुळे विकास प्रकल्प राबवताना पर्यावरणाचा विचार प्रथम केला जात आहे. मुख्यमंत्री म्हणाले, नव्याने उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पांसाठी परदेशातील तंत्रज्ञानांपेक्षा चांगल्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. लवकरच उपनगरीय रेल्वेतही मेट्रोसारखे वातानुकूलित, स्वयंचलित दरवाजे असलेले डबे उपलब्ध होतील. विकासात कोणतीही तडजोड न करता, मुंबईच्या प्रगतीचा वेग अधिक वाढवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शहरात सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे नागरिकांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडत आहेत. मेट्रोचे जाळे 450 किमीपेक्षा जास्त विस्तारले असून, त्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवास सुकर होईल. वाहतूक कोंडी कमी होईल, इंधनाची बचत होईल आणि वेळ वाचेल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मेट्रो आणि इतर प्रकल्प वेगाने राबवले जात आहेत. काही प्रकल्प नियोजित वेळेआधी पूर्ण झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, मुंबईच्या प्रगतीचा वेग देशाच्या विकासासाठी अनिवार्य आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने तिच्या सर्वांगीण विकासासाठी विकास कामे केली जात आहेत. सार्वजनिक सुरक्षितता आणि दर्जेदार पायाभूत सुविधा यासाठी शासन कटिबद्ध आहे.

मुंबईकरांच्या सेवेत विविध प्रकल्प

एमएमआरडीएने उभारलेल्या 70 कोटी रुपयांच्या मंडाले येथील मेट्रो प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. मेट्रोचालकांना सिम्युलेशनवर प्रशिक्षण येथे दिले जाईल. एकाच वेळी 144 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाची देण्याची सोय येथे आहे. या केंद्रामुळे 10 वर्षांत प्रशिक्षण खर्चात 255 कोटींची बचत होईल.

चेंबूर-सांताक्रूझ लिंक केबल स्टेड पूल, रोड भाग 1 हा अशिया खंडातील शंभर मीटर त्रिज्येचा सर्वात मोठा वक्राकार केबल स्टेड पूल आहे.

90 कोटी रुपयांच्या मालवणी येथील कर्मचारी निवासस्थान असणार्‍या दोन इमारतींचे लोकार्पण करण्यात आले. यात एकूण 156 सदनिका आहेत. अग्निरोधक दरवाजे व सुरक्षा प्रणाली सुविधायुक्त, रोबोटिक कार पार्किंग देण्यात आले आहे.

कलानगर जंक्शन येथील आर्म डी उड्डाणपूल तसेच धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा रस्त्यावरील 5.25 कि.मी लांबीच्या विहार क्षेत्र, पादचारी भुयारी मार्गाचे लोकार्पण करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT