नवी मुंबई : राजेंद्र पाटील
सोन्याचे दर गगनाला भिडले असताना दसर्याला गुंजभर का होईना सोने खरेदी करण्याची परंपरा सुरू ठेवत गुरुवारी विजयादशमीच्या मुहूर्तावर मुंबई सराफा बाजारात विक्रमी सोने विक्री नोंदवली गेली. दिवसभरात मुंबईत किमान 100 टन सोने खरेदी झाली. गतवर्षीच्या तुलनेत 20 टन जास्त सोने लुटले गेले. गतवर्षीच्या दसर्याला 80 टन सोने विक्रीची नोंद झाली होती.
दसर्याला 24 कॅरेट सोन्याचे दर 1 लाख 22 हजार रुपयांपर्यंत गेले असतानाही हा विक्रम नोंदवला गेल्याचे इंडिया बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते कुमार जैन यांनी पुढारीला सांगितले. तोळ्याचे चढे भाव बघता यंदाही गतवर्षीप्रमाणेच 80 टन सोने विकले जाईल, असे वाटले होते. मात्र, मुंबईकरांनी गतवर्षीच्या उलाढालीची बरोबरी करून वर आणखी 20 टन सोन्याची खरेदी नोंदवली.
सोन्याच्या दरात वर्षीच्या पहिल्याच दिवशी वाढ झाल्याचे चित्र समोर आले होते. सणासुदीत सोने पहिल्या टप्प्यात लाखाचा टप्पा पार करणार असल्याचे सराफ व्यावसायिकांनी स्पष्ट केले होते. दररोज सोने तोळ्यामागे 1200 ते 2000 रुपयांची भर पडत गेली आणि सोन्याने उच्चांक गाठला.
सोन्याच्या दरात गत पंधरवड्यात तोळ्याला दहा ते बारा हजार रुपयांनी वाढ झाली. साडेतीन मुहूर्तापैकी एक आणि सोने खरेदीचा खास मुहूर्त असलेल्या दसर्याला जळगाव सराफ बाजारात 24 कॅरेटचा भाव प्रति दहा ग्रॅम एक लाख 21 हजार रुपयावरती गेला. चांदीचा दर किलोमागे 25000 रुपयांनी वाढून एक लाख 51 हजार रुपयांवरती गेला. ज्यांनी गेल्या दिड वर्षात सोने खरेदी केले, अशा ग्राहकांचा मोठा आर्थिक फायदा झाला.
वर्षभरात 50 ते 55 हजार रुपयांनी वाढ झाल्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करणारे ग्राहक फायद्यात राहिले. गेल्या वर्षी सोन्याचे दर 72 हजार रुपये होते तर चांदीचे दर 80 हजार रुपये होते. गुरुवारी दसर्याला सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 26 हजार 500 रुपयांवर पोहचले. घडनावळ प्रती तोळे 10 हजार रुपये धरली तर एक तोळे सोने खरेदी करण्यासाठी सुमारे 1 लाख 37 हजार रुपये मोजावे लागले.
मुंबईत गुरुवारी सुमारे 15 हजार बिस्किट्स आणि सोन्याच्या नाण्यांची ( 5, 10, 20,50 आणि 100 ग्रॅम) विक्री झाली. साधारणत: एका सराफ दुकानात 3 ते 5 बिस्किट्स विकले गेले.
मुंबईत 3 हजार सराफ व्यावसायिक आहेत. त्यांच्यामार्फत कानातील बाळ्या 15 टन, चेन आणि अंगठी 40 टन, कानातले 20 टन, ब्रेसलेट 20 टन विकले गेले.
नेकलेस आणि बांगड्या, पाटल्या, गंठण, हार कमी प्रमाणात विकले गेल्याचे कुमार जैन म्हणाले.
जळगाव,नाशिक आणि पुण्यात सोन्यांचे हार, गंठण, बांगड्यासह इतर नवीन डिझाईनच्या दागिन्यांची विक्री झाली. पुण्यात विशेष करून हातातील ब्रेसलेटची, डिझाईन पत्राची विक्री अधिक झाली. गोल्डन मॅन असणार्यांनी ही खरेदी केल्याचे समजते.