पनवेल : विक्रम बाबर
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) आणि महागृहनिर्माण योजना यासारख्या प्रकल्पांमुळे नवी मुंबईचा वेगाने विस्तार होत आहे. याचा परिणाम म्हणून या प्रकल्प क्षेत्रांमध्ये पाण्याची मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे.
पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासह नवी मुंबईच्या गतिमान विकासाला आधार देणार्या पाणी पुरवठा योजनांची आखणी सिडकोकडून करण्यात येत आहे. या अंतर्गत हेटवणे, बाळगंगा आणि कोंडाणे धरणातील पाणी बोगद्यातून नवी मुंबईत आणले जाणार आहे.
पाणी पुरवठा प्रकल्पांचे महत्त्व लक्षात घेऊन जलबोगदे व जलशुद्धीकरण केंद्रांच्या गुणवत्ता आणि प्रगतीवर देखरेख करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञान आणण्याच्या दष्टीकोनातून नामांकित प्रकल्प व्यवस्थापन सल्लागांराची नियुक्ती करण्यात येत आहे. हेटवणे पाणी पुरवठा जलावर्धन योजनेचे काम 2029 च्या मध्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
2050 पर्यंत सिडको आणि नैना क्षेत्रांतील पाण्याची अंतिम मागणी 1275 एमएलडी इतकी प्रकल्पित आहे. ही मागणी पूर्ण करण्याकरिता सिडकोने व्यापक आराखडा तयार केला असून त्या अंतर्गत हेटवणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नवी मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) या सध्या अस्तित्वात असलेल्या जलस्रोतांचा कमाल वापर करण्यासह बाळगंगा धरण व कोंढाणे धरण यांसारखे नवीन जलस्रोत निर्माण करण्याचा समावेश आहे.