रोजंदारी कामगारांची दिवाळी बोनसअभावी अंधारातच pudhari photo
मुंबई

Hospital workers bonus issue : रोजंदारी कामगारांची दिवाळी बोनसअभावी अंधारातच

वेळेत प्रस्ताव पाठवूनही कार्यवाहीकडे दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

मुंबई :मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये कार्यरत असलेल्या 1200 रोजंदारी कामगारांना दिवाळी सरली तरी बोनस मिळाला नाही. त्यामुळे या कामगारांच्या कुटुंबियांमध्ये नाराजी पसरली आहे. केईएम, शीव, नायर, नायर दंत रुग्णालय, शिवडीचे क्षयरोग रुग्णालय आणि बोरिवलीचे बोन मॅरो केेंद्र या ठिकाणी जवळपास 1200 रोजंदारी कामगार कार्यरत आहेत. या सर्वांची दिवाळी अंधारातच गेली.

प्रस्तावच सादर नाही

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 31 हजार रुपये बोनस स्वरूपात मिळाला. 16 ऑक्टोबर रोजी या कर्मचाऱ्यांच्या खात्यात बोनसची रक्कम जमा झाली. याच दिवशी उपायुक्त शरद उघडे यांनी शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांना रोजंदारी आणि बहुउद्देशीय कामगारांच्या बोनस संदर्भातील प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, दिवाळी होऊन गेली तरी हा प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही. महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये 2009 पासून रोजंदारी कामगार तर 2016 पासून बहुउद्देशीय कामगार काम करीत आहेत. महापालिका कर्मचाऱ्यांच्या सोबतच हे कामगार खांद्याला खांदा लावून काम करतात.

या कामगारांना दिवाळीचा बोनस मिळावा यासाठी म्युनिसिपल मजदूर युनियनने 20 ऑक्टोबर रोजी वैद्यकीय शिक्षण व रुग्णालय संचालक डॉ. नीलम अंद्राडे यांची भेट घेऊन बोनस देण्याची मागणी केली होती. मात्र त्यावर पुढे हालचाल न झाल्याने बोनसचा प्रस्ताव रखडला. त्यामुळे या कामगारांना बोनसपासून वंचित रहावे लागले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT