मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानीत सायबर फसवणुकीचे प्रमाण गगनाला भिडले आहे. 2020 पासून तब्बल 20 हजार सायबर गुन्हे घडले असून त्यात तब्बल 2 हजार कोटींची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. यातील किरकोळ रक्कमच सायबर गुन्हे विभागाने परत मिळविली आहे. या सायबर फसवणुकीमध्ये महिला उद्योजकांपासून ते निवृत्त बँक अधिकाऱ्यांपर्यंतचा समावेश आहे.
सायबर गुन्हेगारांनी बॅंकेच्या खात्यातून परस्पर काढून घेतलेली रक्कम देखील खातेधारकांना परत मिळालेली नाही. सायबर तज्ज्ञांच्या मते वित्तीय संस्थांची आर्थिक सुरक्षा असुरक्षित बनली आहे. मात्र या संस्था फसवणुकीचा दोष स्वत:कडे घेण्यास तयार नाहीत. खातेधारकांच्या पैशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी त्यांच्यावरच ढकलून या संस्था मोकळ्या होत आहेत. आर्थिक फसवणुकीनंतर ग्राहकांनाच कायदेशीर नोटीसा पाठवल्या जात आहेत.
क्रेडीट आणि डेबिट कार्डच्या 4,132 फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. एटीएम कार्डचा घोटाळा, सिम कार्ड स्वॅप करणे, क्लोन करणे, ओटीपीव्दारे फसवणूक अशा प्रकारांमध्ये ग्राहकांची 161.5 कोटींची लुबाडणूक करण्यात आली आहे. यापैकी पोलिसांनी केवळ 4.8 कोटी रूपयेच परत मिळवले आहेत. यात फसगत झालेल्यांमध्ये साकीनाका येथील रोमलजीत कौर मक्कर या उद्योजक महिलेचा समावेश आहे. तिला 2.5 लाखांचा गंडा घालण्यात आला. तिचे क्रेडीट कार्ड क्लोन करून हे पैसे काढण्यात आले. ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी ही महिला मुंबईतील आपल्या कार्यालयात बैठकीत होती आणि पैसे लखनऊ येथून काढण्यात आले. सीसीटीव्हीच्या माध्यमातून तिचा पिन चोरण्यात आला होता. दुसऱ्या एका घटनेमध्ये बोरीवली येथील निवृत्त अभियंता नवनीत बात्रा यांची मार्च 2023 मध्ये 1.9 लाखांची फसवणूक झाली होती.
एखाद्या खातेधारकाची फसवणूक झाल्यानंतर त्याला 3 दिवसांच्या आत बँकेत तक्रार द्यावी लागते. ही तक्रार 4 ते 7 दिवसांमध्ये दिली गेल्यास त्याला केवळ 10 ते 25 हजारांपर्यंतची रक्कमच बँकेकडून परत मिळते. सायबर गुन्हे करणारे एटीएमच्या माध्यमातून अधिक ग्राहकांची फसवणूक करतात, असे महाराष्ट्र सायबर सेलचे प्रमुख यशस्वी यादव यांनी सांगितले. तर, अनेक ग्राहक आपला ओटीपी दुसऱ्यांना कळवतात तेव्हा त्यांची फसवणूक ठरलेली असते, असे सायबर तज्ज्ञ रितेश भाटीया यांनी सांगितले. तर, आणखी एक सायबर तज्ज्ञ डॉ. प्रशांत माळी यांच्या म्हणण्यानुसार, बँका रिझर्व बँकेच्या शून्य दायित्व नियमांकडे दुर्लक्ष करतात. सायबर फसवणूक टाळण्यासाठी कडक केवायसी, तातडीने कार्ड ब्लॉक करणे आणि बँकेशी संपर्क साधणेे गरजेचे असते.