मुंबई : सात व आठ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार माहीम परिसरात घडला आहे. याप्रकरणी लैंगिक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच 37 वर्षांच्या आरोपीस माहीम पोलिसांनी अटक केली. त्याला विशेष सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
व्हिडीओ गेम खेळण्यास देतो असे सांगून त्याने या दोन्ही मुलांवर अत्याचार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तक्रारदार महिला ही माहीम येथे राहत असून तिचा आठ वर्षांचा मुलगा आहे. याच परिसरात आरोपी राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. दोन दिवसांपूर्वी या मुलासह त्याच्या सात वर्षांच्या मित्राला आरोपीने त्याच्या घरी आणले. त्यांना व्हिडीओ गेम खेळण्यास देतो असे सांगून त्याने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. सलग दोन दिवस अत्याचार करुन हा प्रकार कोणालाही सांगू नका अशी धमकी आरोपीने दिली होती.
हा प्रकार दोन्ही मुलांकडून तक्रारदार महिलेस समजताच तिने माहीम पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध अनैसर्गिक लैंगिक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच शुक्रवारी सकाळी आरोपीला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली.