नालासोपारा (मुंबई) : 'कायद्याचे हात लांब असतात आणि गुन्हा कितीही जुना असला तरी गुन्हेगार सुटत नाही,' ही म्हण नालासोपारा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवली आहे. सन २००९ मध्ये झालेल्या एका खळबळजनक हत्याकांडातील मुख्य आरोपीला तब्बल १६ वर्षांनंतर अटक करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
२९ एप्रिल २००९ रोजी मीरा रोड येथील रहिवासी विनोद शंकरलाल जयसवाल (३८) हे दलालीचे पैसे मागण्यासाठी आरोपींकडे गेले होते. नालासोपारा पूर्वेतील बिलालपाडा परिसरात आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून विनोद यांचे हात-पाय दोरी व साडीने बांधले आणि टॉवेलने गळा आवळून अत्यंत निघृणपणे हत्या केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात करून आरोपीचा शोध सुरू होता. मात्र, मुख्य आरोपी तेव्हापासून फरार होता. मुख्य आरोपी अविनाश लालताप्रसाद सोनी (४२) हा अटकेपासून बचाव करण्यासाठी सतत आपले ठिकाण व ओळख बदलत होता. तो बराच काळ मध्य प्रदेशातील इटारसी व भोपाळ येथे लपून राहत होता. त्याच्याविषयी माहिती मिळवत असतानाच अलीकडेच पोलिसांना त्याच्याविषयी गोपनीय माहिती मिळाली होती. तो नायगाव पूर्व येथील 'सनटेक वेस्ट वर्ल्ड' परिसरात वास्तव्यास आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास व स्थानिक माहितीच्या आधारे ही 'कोल्ड केस' उघडकीस आणली. काळ लोटला तरी गुन्हे संपत नाहीत आणि पोलीसांच्या फाईली कधीच बंद होत नाहीत. आर- ोपीचा शोध लागेपर्यंत गुन्हा सिद्ध होईपर्यंत पोलीसांकडून तपास सुरूच राहतो.