मुंबई : शिवीगाळ करुन मुलीला मारहाण करणाऱ्या व्यक्तीची दोघांनी बेदम मारहाण करून हत्या केली. हुसैन मोहम्मद उमर शेख असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी योगेश श्रीकांत धिवर ऊर्फ बाला आणि समीर श्रीकांत चिवर या दोघांना वरळी पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
ही घटना शुक्रवारी (दि.10 ) रात्री साडेआठ वाजता वरळीतील जी. एम. भोसले मार्ग, बीडीडी चाळ क्रमांक चौदा आणि पंधरामधील एलआयसी कार्यालयाजवळ घडली. याच परिसरात शेख आणि धिवर कुटुंबीय राहात असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. हुसैनने योगेशच्या मुलीला मारहाण केली होती. हा प्रकार मुलीकडून समजताच योगेश व त्याचा भाऊ समीर हे हुसैनला जाब विचारण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यात प्रचंड वाद झाला होता. रागाच्या भरात या दोघांनी हुसैनला हाताने तसेच लाथ्याबुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यात हुसैन हा गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या माहितीनंतर वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान, या घटनेनंतर एलआयसी कार्यालय परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा तणाव निवळला. याप्रकरणी हुसैनचा भाऊ हसन मोहम्मद उमर शेख याच्या तक्रारीवरून पोलिसांनी योगेश आणि समीर धिवर या दोघांविरुद्ध हत्येसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या या दोघांनाही पोलिसांनी अटक केली.