Mumbai Crime Car hits bike bike rider stabs car driver to death in anger
घाटकोपर : पूर्व द्रुतगती महामार्ग घाटकोपर जवळ दुचाकीस्वार आणि कार चालकात झालेल्या भांडणातून दुचाकीस्वाराने कार चालकाची हत्या केल्याची घटना रविवार दि २५ रोजी घडली. झीशान शेख (वय 36, रा. विक्रोळी पार्कसाईट) असे मृत कार चालकाचे नाव आहे.
रविवारी दुपारी झीशान हा त्याच्या मित्रासह पूर्व द्रुतगती महामार्गावरून कुरल्याच्या दिशेने जात होता. या वेळी घाटकोपर जवळ एका दुचाकी स्वराला झीशानच्या गाडीचा धक्का लागला. यावरून दोघांमध्ये जोरादार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, दुचाकीस्वाराने त्याच्या दुचाकीत ठेवलेला सुरा बाहेर काढला आणि झीशानच्या छातीत खुपसला. या हल्ल्यात झीशान गंभीर रित्या जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेनंतर आरोपी दुचाकीस्वार घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजयकांत सागर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ खूनाच्या गुन्ह्याची नोंद करून अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला. या आरोपीचा शोध घेण्यासाठी उपायुक्तांनी दहा पोलीस पथके तयार केली आहेत.