अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी अनमोल बिश्नोई अमेरिकेत असल्याची माहिती भारतीय अधिकाऱ्यांना दिली आहे.   (File Photo)
मुंबई

गँगस्टर 'अनमोल बिश्नोई'चा ठावठिकाणा मिळाला! US मधून प्रत्यार्पण प्रक्रिया सुरू

Anmol Bishnoi | सलमान खान गोळीबार प्रकरणात आहे मोस्ट वॉन्टेड

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई क्राइम ब्रँचने (Mumbai Crime Branch) अधिकृतपणे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याचा भाऊ मोस्ट वॉन्टेड गँगस्टर अनमोल बिश्नोई (Anmol Bishnoi) याच्या अमेरिकेतून प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू केली आहे. अनमोल बिश्नोई हा बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan firing case) याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेसह संपूर्ण भारतातील इतर अनेक प्रकरणात मुंबई पोलिसांना हवा आहे.

मुंबई पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार, अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी अनमोल बिश्नोई अमेरिकेत असल्याची माहिती भारतीय अधिकाऱ्यांना दिली आहे. मुंबई क्राइम ब्रँचने अनमोल बिश्नोईचे प्रत्यार्पण करत असल्याची माहिती मुंबई सत्र न्यायालयात दिली आहे. तसेच लवकरच पुढील प्रत्यार्पण प्रक्रियेसाठी फाईल केंद्राकडे पाठवली जाणार आहे.

'अनमोल बिश्नोई'चा मोस्ट वॉन्टेड यादीत समावेश

अनमोल बिश्नोई याच्यावर भारतात सुमारे १७ गुन्हेगारी खटले आहेत. सलमान खान गोळीबार प्रकरणात त्याचा भाऊ गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्यासमवेत त्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे. गेल्या आठवड्यात राष्ट्रीय तपास एजन्सी (NIA) ने अनमोल बिश्नोईच्या नावाचा मोस्ट वॉन्टेड यादीत समावेश केला आहे. त्याच्या अटकेसाठी १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

'अनमोल बिश्नोई'वर इम्पोर्टेड शस्त्रे पुरवल्याचा आरोप

पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी वॉन्टेड असलेला अनमोल बिश्नोई याच्यावर हत्या घडवून आणण्यासाठी इम्पोर्टेड शस्त्रे पुरवल्याचा आरोप आहे. १२ ऑक्टोबर रोजी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी बिश्नोई गँगने तुर्की बनावटीचे तिसास पिस्तूल आणि एक ग्लॉक बंदुक पुरवल्याचा आरोप आहे. बिश्नोई हा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील एका संशयिताच्या संपर्कात होता. त्यामुळे त्याचा या प्रकरणात संभाव्य सहभाग असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले आहे.

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : शूटर्स होते अनमोल बिश्नोईच्या संपर्कात

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui Murder Case Update) यांच्या हत्या प्रकरणात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याच्या भावाचे नाव समोर आले आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येपूर्वी शूटर्स लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई (Anmol Bishnoi) याच्या संपर्कात होते. तीन संशयित शूटर्स हत्येच्या घटनेपूर्वी अनमोल बिश्नोई याच्याशी इन्स्टंट मेसेजिंग ॲप स्नॅपचॅटच्या (Snapchat) माध्यमातून बोलत होते. अनमोल बिश्नोई हा कॅनडा आणि अमेरिकेत असणाऱ्या संशयित आरोपींच्या संपर्कात होता, अशी माहिती याआधी मुंबई गुन्हे शाखेने दिली होती. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १० जणांना अटक केली आहे. यात दोन शूटर आणि शस्त्रास्त्र पुरवठादार करणाऱ्यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT