Milk Adulteration Pudhari
मुंबई

Goregaon milk adulteration : गोरेगावात ५५८ लिटर भेसळयुक्त दूध जप्त

दोघांना अटक : मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने गोरेगाव (पश्चिम) परिसरात मोठी कारवाई करत नामांकित कंपन्यांच्या दुधात अस्वच्छ पाणी मिसळून विक्री करणाऱ्या दोन जणांना अटक केली. या कारवाईत ५५८ लिटर भेसळयुक्त दूध, २२४ रिकाम्या दूध पिशव्या, भेसळीसाठी वापरलेले साहित्य आणि मोबाईल फोन असा सुमारे ५०हजार ३०४ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ११ ला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, प्रेमनगर, तीन डोंगरी, लिंक रोडजवळील एका ठिकाणी अमूल आणि गोकुळ या नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्या कापून त्यातील काही दूध काढले जात होते.

त्यानंतर त्यात मानवी आरोग्यास अपायकारक असे अस्वच्छ पाणी मिसळून पिशव्या पुन्हा सील करून ग्राहकांना मूळ कंपनीचे दूध असल्याचे भासवून विक्री केली जात होती. या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेने अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह छापा टाकला.

कारवाईदरम्यान भेसळयुक्त दूध, रिकाम्या पिशव्या आणि भेसळ करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT