मालाड: मालाड पूर्व येथील शांती नगर भागात सुरू असलेल्या एका नवीन इमारतीच्या बांधकाम साईटवर आठव्या मजल्यावरून खाली पडून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ईशराफूल (Ishraful) नावाचा हा मजूर सोमवारी (दि.१०) दुपारी १२.३९ ते १ वाजताच्या दरम्यान काम करत असताना ही घटना घडली.
बांधकाम सुरू असलेल्या साईटच्या आठव्या मजल्यावरून खाली पडून मजूर गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णवाहिकेने जोगेश्वरी येथील ट्रामा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
मागील एका आठवड्यात मालाड पश्चिम आणि पूर्व भागात बिल्डरच्या साईटवर घडलेली ही दुसरी मोठी दुर्घटना आहे, ज्यात दोन मजुरांनी आपला जीव गमावला आहे. या घटनांमुळे बांधकाम साईटवर काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तसेच, पालिकेचा बांधकाम विभाग आणि श्रम विभाग या प्रशासकीय यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरही मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
काही दिवसांपूर्वीच याच परिसरात १९०० किलो वजनाची एक क्रेन कोसळण्याची मोठी दुर्घटना घडली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही मनुष्यहानी झाली नव्हती, परंतु क्रेन १८ टायरच्या एका ट्रकवर पडल्यामुळे ट्रकाचे दोन तुकडे झाले होते.