मुंबई : उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे यांच्याशी आगामी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये एकत्र लढण्यास नकार दिलेल्या काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने रविवारी वंचितचे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. आघाडीचा निर्णय करण्यासाठी काँग्रेस आणि वंचितच्या संयुक्त समितीची बैठक होणार आहे.
यावेळी या भेटीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव यू. बी. व्यंकटेश, सचिन सावंत व माजी मंत्री आमदार अस्लम शेख आदी मान्यवर उपस्थित होते. ठाकरे बंधूंनी मुंबईत एकत्र येण्याचा निर्णय केल्यानंतर काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला. स्वतः काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनीच तशी घोषणा केली. काँग्रेसच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली. मात्र, मुंबई काँग्रेसने इंडिया आघाडीतील इतर काही पक्षांशी आघाडी करण्यासंदर्भात चर्चा सुरू केली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने रविवारी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली.