Mumbai Congress News
मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्ष एक मोठा आणि धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. महाविकास आघाडीचा घटक म्हणून लढण्याऐवजी स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी पक्षाने चाचपणी सुरू केली आहे.
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ही नवी रणनीती आखली असून, स्वतंत्र लढल्यास पक्षाला अधिक फायदा होईल, असा विश्वास मुंबईतील काँग्रेस नेत्यांना वाटत आहे.
काँग्रेसच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या मते, महाविकास आघाडीत निवडणूक लढल्यास जागावाटपात पक्षाला मोठा फटका बसू शकतो. मुंबईतील उत्तर भारतीय, दलित आणि मुस्लीम मतदार हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार मानला जातो. आघाडी झाल्यास या भागातील जागा मित्रपक्षांना सोडाव्या लागतील, ज्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे, जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, तर राज यांच्या भूमिकेवर नाराज असलेला मतदार वर्ग महाविकास आघाडीला मतदान करणार नाही, असे काँग्रेसचे गणित आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढल्यास हा नाराज मतदार आपल्याकडे वळवता येईल, असा पक्षाचा अंदाज आहे.
या सर्व शक्यता लक्षात घेता, काँग्रेसने निवडणुकीपूर्वी स्वतंत्रपणे लढून आपली ताकद आजमावण्याचा आणि निकालानंतर गरज पडल्यास आघाडी करण्याचा विचार सुरू केला आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांना स्वबळावर लढण्याच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले आहेत.