Mumbai Coastal Road Traffic Rules Pudhari
मुंबई

Mumbai Coastal Road speed limit: कोस्टल रोडवर कायम वाहतूक निर्बंध; ८० किमी वेगमर्यादा, दुचाकी-तीनचाकींसह जड वाहनांनाही प्रवेशबंदी

बोगद्यात ताशी ६० किलोमीटर, तर वळणाच्या ठिकाणी अथवा रस्ता एकत्र येणाऱ्या ठिकाणी ४० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा राहणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबईच्या कोस्टल रोड आणि राजीव गांधी सागरी सेतूवरील वाहतूक व्यवस्थेला आता कायमस्वरूप देण्यात आले आहे. यापूर्वी लागू असलेल्या तात्पुरत्या वाहतूक अधिसूचना रद्द करून प्रवेश-निर्गमनाचे मार्ग, वाहनांवरील निर्बंध, वेगमर्यादा तसेच वाहन थांबविण्याबाबतचे नियम निश्चित करण्यात आले आहेत.

अपर पोलीस आयुक्त (वाहतूक) मोक्षदा पाटील यांनी २५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वाक्षरी केलेल्या अंतिम अधिसूचनेनुसार कोस्टल रोडच्या सरळ मार्गावर वाहनांचा कमाल वेग ताशी ८० किलोमीटर निश्चित करण्यात आला आहे. बोगद्यात ताशी ६० किलोमीटर, तर वळणाच्या ठिकाणी अथवा रस्ता एकत्र येणाऱ्या ठिकाणी ४० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा राहणार आहे.

कोस्टल रोड आणि सी लिंकवर सर्व प्रकारच्या दुचाकी, सायकल, मोपेड, स्कूटर तसेच तीनचाकी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. साइडकार असलेल्या दुचाकींनाही प्रवेश मिळणार नाही.

जड वाहनांनाही प्रवेश नाही

याशिवाय मालवाहू वाहने, टेम्पो, ट्रक, ट्रेलर, मिक्सर, ट्रॅक्टर आणि इतर अवजड वाहनांनाही या मार्गावर प्रवेश करता येणार नाही. मात्र (BEST) बेस्ट बस, प्रवासी बस, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने आणि इतर आपत्कालीन सेवांच्या वाहनांना अपवाद करण्यात आला आहे. प्राण्यांनी ओढल्या जाणाऱ्या गाड्या, बैलगाडी, घोडागाडी, हातगाडी तसेच पादचाऱ्यांनाही कोस्टल रोडवर प्रवेश करता येणार नाही.

दक्षिण दिशेला सहा प्रवेशमार्ग

दक्षिण दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी वांद्रे टोल प्लाझा, जे. के. कपूर सर्कल अंडरपास, स्व. बिंदू माधव ठाकरे जंक्शन, बॅरिस्टर रजनी पटेल जंक्शन (लोटस जंक्शन), वत्सलाबाई देसाई चौक (हाजी अली जंक्शन) आणि अमरसन्स गार्डन हे प्रवेशमार्ग निश्चित करण्यात आले आहेत. दक्षिण दिशेने बाहेर पडण्यासाठी वरळी सी लिंक गेट, बॅरिस्टर रजनी पटेल जंक्शन, वत्सलाबाई देसाई जंक्शन, अमरसन्स गार्डन आणि मरीन ड्राइव्ह (प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज) हे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

उत्तर दिशेचेही प्रवेश-निर्गमन मार्ग निश्चित

उत्तर दिशेने जाण्यासाठी मरीन ड्राइव्ह, अमरसन्स गार्डन, वत्सलाबाई देसाई जंक्शन, बॅरिस्टर रजनी पटेल जंक्शन, स्व. बिंदू माधव ठाकरे जंक्शन आणि जे. के. कपूर सर्कल अंडरपास हे प्रवेशमार्ग असतील.

उत्तर दिशेने बाहेर पडण्यासाठी अमरसन्स गार्डन, वत्सलाबाई देसाई जंक्शन, बॅरिस्टर रजनी पटेल जंक्शन, स्व. बिंदू माधव ठाकरे जंक्शन, वरळी सी लिंक गेट आणि वांद्रे टोल प्लाझा हे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

२४ तास वाहतूक सुरू

कोस्टल रोड आणि राजीव गांधी सागरी सेतूवरील संबंधित मार्ग २४ तास वाहतुकीसाठी खुले राहणार आहेत. वाहनांची सुरक्षितता आणि वाहतूक शिस्त कायम ठेवण्यासाठी अंतिम अधिसूचनेतील नियमांचे पालन करणे वाहनचालकांना बंधनकारक राहणार आहे.

वाहन थांबवून फोटो काढण्यास मनाई

कोस्टल रोडवर बेस्ट बस वगळता अन्य वाहनांना प्रवासी चढविण्यासाठी किंवा उतरविण्यासाठी थांबता येणार नाही. तसेच मार्गावर वाहन थांबवून फोटो किंवा व्हिडीओ शूटिंग करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT