मुंबई: कोस्टल रोडवर भरधाव बीएमडब्ल्यू कठडा तोडून सुमारे ७५ फूट खाली कोसळल्याने तिघा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि एक जण गंभीर जखमी झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी वेगासह अपघाताच्या अन्य कारणांचा तपास सुरू केला आहे.
प्राथमिक अंदाजानुसार अपघाताच्या वेळी बीएमडब्ल्यूचा वेग सुमारे १२० किलोमीटर प्रतितास असावा. कोस्टल रोडच्या मुख्य मार्गावरील वेगमर्यादा ८० किलोमीटर प्रतितास आहे. त्यामुळे वळण घेताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले असावे.
अपघातावेळी चालकाने मद्यप्राशन केले होते का, याची पडताळणी करण्यासाठी मृतांच्या वैद्यकीय नमुन्यांची तपासणी केली जाणार आहे. तसेच अपघातग्रस्त बीएमडब्ल्यूची प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तांत्रिक तपासणी करण्यात येणार आहे. वाहनात काही तांत्रिक बिघाड झाला होता का, ब्रेक किंवा अन्य यंत्रणेत काही समस्या होती का, याचाही तपास सुरू आहे.
वळणावर ताबा सुटल्याचा अंदाज
रविवारी पहाटे सुमारे पाचच्या सुमारास लोटस जेट्टीजवळ, लाला लजपतराय महाविद्यालयासमोर हा अपघात झाला. बीएमडब्ल्यू मरीन ड्राइव्हकडून हाजी अलीच्या दिशेने जात होती. भरधाव वाहन वळणावर कठड्याला धडकले.
त्यानंतर कठडा तोडून वाहन सुमारे ७५ फूट खाली बांधकाम सुरू असलेल्या जागेत कोसळले. अपघाताची माहिती मिळताच ताडदेव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चौघांनाही नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले.या अपघातात धैर्य दर्शन शेठ (१७), आदित्य जकासनीया (१९) आणि शनय गजर (२१) यांचा मृत्यू झाला.
आदित्य कल्पेश्वर ओसवाल (२३) हा गंभीर जखमी झाला. सुरुवातीला त्याच्यावर नायर रुग्णालयात उपचार केले जात होते. आता त्याला ब्रिचकँडी हॉस्पीटलमध्ये हलविण्यात आले आहे. त्याचा जबाब तपासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. अपघातापूर्वी वाहनात नेमके काय घडले, याबाबत त्याच्या जबाबातून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अपघातात मृत्यू झालेल्या धैर्य दर्शन शेठ (१७), आदित्य जकासनीया (१९) आणि शनय गजर (२१) यांचे कुटुंबीय मुंबईत दाखल झाले. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिन्ही विद्यार्थ्यांचे पार्थिव कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. तिघांचे पार्थिव अहमदाबाद येथे नेण्याची व्यवस्था करण्यात आली.
याच बीएमडब्ल्यूचा मार्चमध्येही अपघात
दरम्यान, याच बीएमडब्ल्यूचा मार्च २०२६मध्येही अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या वेळी वाहनाच्या धडकेप्रकरणी गावदेवी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. या घटनेचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. मात्र, मार्चमधील त्या अपघाताचा सध्याच्या जीवघेण्या अपघाताशी थेट संबंध आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस त्या घटनेचीही माहिती तपासत आहेत.