मुंबई : प्रशासकीय अभ्यासक्रम पूर्ण करणार्या मुंबई महापालिकेतील लिपिक व निरीक्षकांना मिळणारी विशेष वेतनवाढ यापुढे मिळणार नाही. तसे परिपत्रकही प्रशासनाकडून जारी करण्यात आल्याने पालिका कर्मचार्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. निर्णय मागे घ्या, नाहीतर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
महापालिकेत लिपीक, निरीक्षकांना रूजू झाल्यानंतर पाच वर्षांची सेवा झाल्यानंतर एलएसजीडी (लोकल सेल्फ गर्व्हमेंट डिप्लोमा) आणि एलजीएस ( डिप्लोमा इन लोकल सेल्फ गर्व्हमेंट सर्विस) या प्रशासकीय परीक्षा दिल्यानंतर विविध टप्प्यांवर 1967 पासून ही विशेष वेतनवाढ मिळत होती. ती आता बंद होणार आहे. यामुळे पालिकेतील तीन ते चार हजार कर्मचारी या वेतनवाढीला मुकणार आहेत. पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने सादर केलेल्या या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांनी 21 ऑगस्टला प्रशासकीय मंजुरी दिली. हा निर्णय घेत असताना महापालिका प्रशासनाने सध्या वेतनश्रेणी लागू असलेल्या कर्मचार्यांना वगळण्यात आले आहे. मात्र दोन वेतन श्रेणी मिळावी म्हणून ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कर्मचार्यांना याचा लाभ न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. हा निर्णय पालिका कर्मचार्यांना विश्वासात न घेता घेण्यात आल्याने कर्मचार्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.
मुंबई महापालिकेतील लिपिक व निरीक्षक संवर्गातील कर्मचारी, अधिकार्यांचा मेळावा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दादर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालिका प्रशासनाने वेतन वाढ रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल कर्मचार्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एवढंच नाही तर हा निर्णय रद्द करण्याचा ठरावही संमत करण्यात आला. महापालिका प्रशासनाने हा निर्णय रद्द न केल्यास, तीव्र आंदोलन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.