BMC emergency response Flood Preparedness
मुंबई: मुंबई शहर व उपनगरात धो.. धो.. पाऊस ओतू लागल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयातील आपत्कालीन टीम रस्त्यावर उतरली. पण पावसाचा जोर इतका होता की त्यांच्या कामामध्ये अडथळा निर्माण होत होता. परंतु जसा पावसाचा जोर ओसरतात अवघ्या तासाभरात तुंबईमुक्त मुंबई करण्यात कामगारांना यश आले.
मुसळधार पावसामुळे मुंबई शहरात तुंबलेल्या पाण्याचा निचरा होण्यास काही प्रमाणात विलंब झाला. परंतु भर पाण्यात कार्यरत राहून कामगारांनी गटाऱ्यांच्या प्रवेशद्वारावर अडकलेला कचरा काढून पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न केला. तर ३० ते ३५ ठिकाणी पाणी उपसा पंप सुरू करण्यात आले. या संपूर्ण घडामोडीवर महापालिका आयुक्त भूषण गगराणी महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन कक्षात बसून लक्ष ठेवून होते. एवढेच नाही तर जेथे पाणी तुंबत होते. तेथे विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांशी संपर्क साधून त्यांना सूचना करत होते. या टीमवर्कमुळेच पाण्याचा तातडीने निचरा झाला आणि मुंबईकरांना दिलासा मिळाला.
महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या कामगारांसह आपत्कालीन विभागाचे कामगार व विभाग कार्यालयाच्या हद्दीतील कामगार यांची उत्तम कामगिरी मध्यरात्रीपासून मुंबईकरांना अनुभवायला मिळाली. भर पावसात भिजत अनेक कामगारांनी पाणी निचरा करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे या कामगारांना पालिका आयुक्त यांच्या शाबासकीची थापही मिळाली.
शहरात तुंबलेल्या पाण्याचा तातडीने निचरा व्हावा, यासाठी हाजी अली, ब्रिटानिया, वरळी लव्हग्रोह, क्लिव्हलँड, गझदरबंद हे सहा पंपिंग स्टेशन सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. या पंपींग स्टेशनमध्ये ४३ पंप कार्यरत आहेत. प्रत्येक पंपाची पाणी उपसा क्षमता प्रति सेकंदाला ६ हजार लिटर इतकी आहे.