प्रकाश साबळे
मुंबई : महानगरपालिकेत महापौर, विरोधी पक्षनेत्या, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, महापालिका सचिव आणि विविध १३ समिती व प्रभाग समिती अध्यक्ष पदावर महिला असतांना आता मुंबई शहर, पुर्व आणि पश्चिम उपनगरांचा महापालिकेचा कारभार तीन महिला उपायुक्तांच्या हाती आला आहे. यामुळे मुंबई महानगरपालिकेत आता प्रशासकीय राजसुद्धा महिलांचे झाले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या शहर परिमंडळ - १ मध्ये उपायुक्त चंदा जाधव, पश्चिम उपनगरे परिमंडळ ४ विभागात भाग्यश्री कापसे तर पूर्व उपनगरे परिमंडळ - ५ मध्ये उपायुक्त म्हणून संध्या नांदेडकर यांची १५ एप्रिल रोजी नियुक्ती करण्यात आली. अशाप्रकारे मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरे परिमंडळातील कारभारांवर तीन महिला उपायुक्तांची छाप पडली आहे.
मुंबई महापालिकेत २२७ पैकी १३५ सर्वपक्षीय महिला निवडून आल्या आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेत ५० टक्क्यांहून अधिक महिला आहेत. मुंबई महापालिकेची महत्त्वाची स्थायी समिती असो वा अन्य समिती त्याठिकाणी अध्यक्ष, सदस्या महिला आहेत. मुंबई महापालिकेच्या सभागृहात महिलांची संख्या अधिक असल्याने सभागृहात महिलांचा बोलबाला आहे.
महानगरपालिका प्रशासनात उपायुक्त संवर्गात पदासाठी किमान ७ वर्ष सहाय्यक आयुक्त संवर्गातील पदाचा कार्यकाल पुर्ण करावा लागतो. यामुळे महानगरपालिकेत उपायुक्त पदाला विशेष दर्जा आणि निर्णय घेण्याची पावरसुद्धा आहे. तसेच पालिका विभाग कार्यालयातील ३ ते ४ सहाय्यक आयुक्त कामकाजावर नियंत्रण व देखरेख ठेवण्याची मोठी भूमिकासुद्धा उपायुक्त यांच्याकडून बजाविली जाते. त्यांच्या कामांचा मोठा व्याप असतो, तसेच त्यांचा थेट संपर्क हा महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि महापौर यांच्यांशी असतो. यामुळे पालिका विभाग कार्यालय आणि परिमंडळात या पदावर महत्वाचे स्थान आहे.
परिमंडळ - १ च्या अंतर्गत महापालिकेची वाॅर्ड ए, बी, सी, डी आणि ई विभाग कार्यालये येतात.
परिमंडळ ४ मध्ये एम.पुर्व, एम.पश्चिम आणि एल वाॅर्ड विभाग कार्यालये आहेत.
तसेच परिमंडळ - ५ मध्ये के.पश्चिम, पी.दक्षिण, पी.उत्तर, पी.पुर्व आदीं
या परिमंडळात या महिला उपायुक्त :
परिमंडळ - १ उपायुक्त चंदा जाधव
परिमंडळ - ४ उपायुक्त भाग्यश्री कापसे
परिमंडळ - ५ उपायुक्त संध्या नांदेडकर