नवी दिल्ली : मुंबई ते चेन्नई आणि हावडा दरम्यानचे रेल्वे जाळे अधिक वेगवान करण्यासाठी आणि दक्षिण-पूर्व कॉरिडॉरमध्ये ५४० किलोमीटरच्या मल्टिट्रॅकिंगसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने दोन महत्त्वाच्या प्रकल्पांना हिरवा कंदील दाखवला आहे. मुंबईहून हावडा आणि चेन्नईकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा तसेच मालवाहतूक अधिक वेगवान व्हावी, यासाठी केंद्राने या दोन्ही उच्च-घनतेच्या रेल्वे कॉरिडोअरची क्षमता वाढवण्याचे प्रकल्प मंजूर केले आहेत. यासाठी हजारो कोटींचा खर्च केला जाणार आहे. यादरम्यान मुंबई ते चेन्नई मार्गांवर चार मार्गिका तयार केल्या जातील.
सध्या या मार्गांवर तीन मार्गिका आहेत, तिथे चौथी लाईन टाकण्याचे काम केले जाईल. यात मुंबई-चेन्नई नेटवर्कमध्ये पुणे आणि सोलापूर हे अतिशय महत्त्वाचे थांबे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती व प्रसारण आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली.
मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गावर चौथ्या मार्गिकेचे काम वेगाने सुरू
मुंबई ते चेन्नई दरम्यानचे रेल्वे जाळे चार मार्गिकांचे (फोर लेन) बनवण्याच्या दिशेने टप्प्याटप्प्याने काम पुढे जात आहे. मुंबई ते कल्याणपर्यंत चार मार्गिका आधीच तयार झाल्या आहेत. कल्याण ते कर्जत दरम्यान चौथ्या मार्गिकेचे काम सुरू आहे. यानंतरच्या कर्जत-तळेेगाव-पुणे-वाडी टप्प्यात चौथ्या मार्गिकेसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे. तसेच, वाडी ते गुंटकल दरम्यान चौथ्या मार्गिकेचे काम सुरू आहे.