Administrative Reshuffle Pudhari
मुंबई

Administrative Reshuffle: महत्त्वाची खाती, प्राधिकरणांच्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांत चुरस

काही सनदी अधिकाऱ्यांना सध्याच्या पदावर मुदतवाढ, तर काहींच्या होणार बदल्या

पुढारी वृत्तसेवा

नरेश कदम

मुंबई: मुंबई महापालिका आयुक्तपदाचा निर्णय झाला असला तरी अद्याप म्हाडा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सिडको, एसआरए , एमआयडीसी अशा महत्त्वाच्या प्राधिकरणांवरील प्रमुख पदांवर सनदी अधिकाऱ्यांचा डोळा आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या पदांवर सनदी अधिकाऱ्यांमध्ये कमालीची चुरस असली तरी यातील काही सनदी अधिकाऱ्यांना सध्याच्या पदावर मुदतवाढ, तर काहींच्या बदल्या होणार आहेत.

मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे 31 मार्चला सेवानिवृत्त झाले. त्यामुळे या महत्त्वाच्या पदासाठी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा होती. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विश्वासातील सनदी अधिकारी अश्विनी भिडे यांची नियुक्ती केली. यामुळे महायुतीच्या बड्या नेत्यांचा दबाव सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये ऐकणार नाही, असा मुख्यमंत्र्यांचा संदेश नोकरशहांमध्ये गेला आहे.

मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्तपद, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालकपद , झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद, एमआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालकपद आणि म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालकपद ही पदे महत्त्वाची मानली जातात.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त सध्या संजय मुखर्जी असून त्यांना या पदावर तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु ते मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील असून प्राधिकरणाचे काही मोठे प्रकल्प पूर्ण करायचे असल्याने त्यांना आणखी एक वर्षाची मुदतवाढ मिळेल. मुखर्जी यांचे नाव मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाच्या शर्यतीत होते.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांना या पदावर केवळ दोन वर्षे झाली आहेत. राज्य शासनाचा 150 दिवसांचा ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला दुसरा क्रमांक मिळाला आहे. त्यांनी अनेक सुधारणा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात केल्या आहेत. त्यामुळे त्यांना या पदावर कार्यकाळ पूर्ण दिला जाईल.

म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव जयस्वाल यांना या पदावर तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र गृहनिर्माण मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जयस्वाल यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे जयस्वाल यांच्या बदलीसाठी शिंदे खूप आग्रही आहेत.

त्यामुळे यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे उत्सुकतेचे ठरेल. एमआयडीसीतील सनदी अधिकारी अश्विन मुदगल हे सिडको, म्हाडा अशा अनेक महत्त्वाच्या ठिकाणच्या पदांसाठी फिल्डिंग लावून आहेत. त्यांच्या नावाची सनदी अधिकाऱ्यांच्या वर्तुळात चर्चा आहे.

जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर हे एप्रिलअखेरीस सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे एप्रिलअखेरीस मंत्रालयातील महत्त्वाच्या खात्यांचा खांदेपालट होण्याची शक्यता आहे.

सिडकोची जबाबदारी विजय सिंघल यांच्याकडेच

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना या पदावर दोन वर्षेच झाली आहेत. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच विमानतळ विस्तार आणि नैना असे अनेक प्रकल्प अद्याप पूर्ण झालेले नाहीत, त्यामुळे सिंघल यांनाही सिडकोमधून हलविले जाणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT