घाटकोपर : घाटकोपरच्या अमृतनगर विभागात बुधवारी (दि. ३) रात्रीच्या वेळी 'न्यू वसंत व्हिला' या तीन मजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. तिसऱ्या मजल्यावर सुरू झालेल्या या आगीने रौद्ररूप धारण केले आणि इमारतीचे दोन मजले आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दहा बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र आगीची तीव्रता प्रचंड असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला रात्री उशिरापर्यंत अथक प्रयत्न करावे लागले. अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते.
सुदैवाने, ज्यावेळी आग लागली, त्यावेळी घरात उपस्थित असलेल्या व्यक्तींना आगीची चाहूल लागली आणि त्यांनी तात्काळ बाहेर धाव घेतल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आगीत इमारतीचे दोन मजले पूर्णपणे खाक झाले असून, लाखो रुपयांचे मालमत्तेचे नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या घटनेची अधिक चौकशी करत आहेत.