मुंबई : जलवाहिन्यांमधून होणाऱ्या पाण्याच्या गळतीमुळे वाया जाणारे लाखो लिटर पाणी वाचवण्यासाठी मुंबई महापालिका नवीन अद्ययावत यंत्रणेची चाचपणी करीत आहे. या यंत्रणेची चाचणी केल्यानंतर ते यंत्र योग्य आहे की नाही, याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यानंतर त्याची खरेदी करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
जलवाहिन्यांमधून होणाऱ्या पाण्याच्या गळतीमुळे दररोज सरासरी ३०० ते ३५० दशलक्ष लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे या पाण्याची बचत करून, मुंबईतील पाणीटंचाई सोडवण्यासाठी पालिकेच्या जल अभियंता विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी जलवाहिन्यांमधून होणारी गळती तातडीने शोधून जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी अद्ययावत यंत्रणेचा शोध सुरू आहे.
भूमिगत जलवाहिन्यांमधील गळती अधिक जलद व प्रभावीपणे शोधण्याकरता बाजारात आधुनिक तंत्रज्ञान व अध्ययवत यंत्र उपलब्ध आहे का याबाबत चाचपणी करण्यात येत आहे विविध कंपन्यांमार्फत प्रत्यक्ष चाचणी केल्यानंतर योग्य तंत्रज्ञान युक्त गळती शोधण्याचे यंत्र खरेदी करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
महापालिकेच्या अभियंत्यांनी गळती शोधून काढणाऱ्या यंत्राची निर्मिती करणाऱ्या सुमारे पाच ते सहा कंपन्यांशी संवाद साधला आहे. या कंपन्यांकडे असलेल्या अत्याधुनिक यंत्रणेचा अभ्यास करून, ही यंत्रणा गळती शोधण्यासाठी किती सक्षम आहे की नाही, याचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानंतरच कोणती यंत्रणा खरेदी करायची याबाबत निर्णय घेतला जाईल असे जल अभियंता विभागातील वरिष्ठ अभियंत्यांकडून सांगण्यात आले.
सध्या स्कॅनिंगद्वारे शोधली जाते गळती
जलवाहिन्यांमधून होणारी पाण्याची गळती शोधण्यासाठी सध्या महापालिकेच्या जल अभियंता विभागाकडे टी-१० लेक डिटेक्शन मशीन आहे. गळतीचे संभाव्य ठिकाणी निश्चित करून आवश्यकतेनुसार तेथे खोदकाम केले जाते. जलवाहिनीची प्रत्यक्ष तपासणी करून ती दुरुस्ती केली जाते. त्याशिवाय गळती शोधण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा द्वारे संपूर्ण जलवाहिनी स्कॅन करण्यात येते. कुठलाही अडथळा नसल्यास अंदाजे १०० मीटर इतकी जलवाहिनी एकावेळी स्कॅन केली जाते. अशावेळी हमखास गळती सापडते, असा दावा अभियंत्यांनी केला आहे.