BMC Standing Committee Hall pudhari photo
मुंबई

BMC Standing Committee Hall : मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभागृह निसरडेच

अध्यक्षांसह प्रशासनाचे दुर्लक्ष, कार्यकारी अभियंत्यांचे बेजबाबदार वक्तव्य, नगरसेवकांमध्ये संताप

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : प्रकाश साबळे

मुंबई महापालिकेच्या तिजोरीची चावी असलेल्या स्थायी समितीचा सभा घेणारा सभागृहात निसरडेपणा निर्माण झाल्याने पाय घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. मात्र याकडे अध्यक्षांसह प्रशासनाचे दुर्लक्ष असून, यात महापालिका मुख्यालयातील कार्यकारी अभियंत्यांचे बेजबाबदार वक्तव्य समोर आले आहे. याप्रकरणी नगरसेवकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला आहे. तर बेजबाबदार कार्यकारी अभियंता यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात निसरडेपणा या मथळ्याखाली दै.पुढारीने १३ नोव्हेंबर २०२६ रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांची पुढारीच्या प्रतिनिधीने भेट घेतली असता, शिंदे यांनी कार्यकारी संजय आढाव यांना फोन करून सभागृहात कारपेट टाकण्याचे निर्देश दिले.

यानंतर काही वेळानंतर पुढारीच्या प्रतिनिधीने आढाव यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला असता, आढाव म्हणाले की, मला कुणाचाही फोन आला नाही. स्थायी समिती सभागृह निसरडा झाला असेल आणि एखाद्याचा पाय घसरला असेल तर मी काही करु शकत नाही, असे बेजबाबदार वक्तव्य कार्यकारी अभियंता (महापालिका मुख्यालय) संजय आव्हाड केले.

अभियंत्यावर कारवाई करणार?

स्थायी समितीच्या बैठकांसाठी नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार उपस्थित असतात. अशा ठिकाणी सभागृहातील पृष्ठभाग निसरडी असल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाय घसरून पडण्याच्या घटनांमुळे संबंधितांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अशावेळी कार्यकारी अभियंता संजय आढाव यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्याचा स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृह नेता यांच्याकडून कारवाई होईल? असा प्रश्न एमआयएमचे नगरसेवक जमीर कुरेशी यांनी उपस्थित केला.

प्रशासन तातडीने दखल घेणार का?

निसरड्या पृष्ठभागाची दुरुस्ती करणे, आवश्यक ठिकाणी अँटी-स्किड व्यवस्था करणे गरजेचे आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कारपेट टाकण्याची मागणी

सभागहातील पृष्ठभाग निसरडा झाल्याने सदर जागेवर कापरेट टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सभागृहात काही जेष्ठ नागरिक सुद्धा सदस्य आहेत. यांचीही सुरक्षा ऐरणीवर आली आहे. याकडे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी जातीने लक्ष देवून सदर जागेची दुरूस्ती कशी होईल, याकडे लक्ष देण्याची मागणी सदस्यांनी केली आहे.

प्रशासन गंभीर नसेल, तर यांची आम्ही दखल घेवू, येत्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये यांचा जाब संबंधित कार्यकारी अभियंता यांना विचारण्यात येईल.
गणेश खणकर, स्थायी समिती सदस्य तथा, सभागृहनेता
सभागृहात काही वेळा आमचाही पाय घसरला होता. यामुळे नगरसेवकही असुरक्षित आहेत. असे प्रकार होवू नये, यासाठी लवकरात लवकर दुरूस्ती करण्यात यावी.
लक्ष्मी भाटीया, नगरसेविका, स्थायी समिती सदस्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT