BMC  pudhari photo
मुंबई

BMC Committee Meeting: मुंबई महानगरपालिकेच्या समिती सभेचा घोळ कायम! स्थायी, सुधार समितीची सभा एकाच दिवशी; फक्त २ तासांचा फरक

समितीमधील सदस्यांसह प्रशासनाची पुन्हा एकदा तारांबळ उडणार असल्याचे दिसून येत आहे.

पुढारी वृत्तसेवा

प्रकाश साबळे

मुंबई: मुंबई महापालिकेच्या वैधानिक समिती सभेचा दिनांक आणि वेळेचा घोळ थांबता थांबेना. आता तर १२ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी स्थायी समिती व सुधार समितीची सभा आयोजीत केली आहे. यामुळे या समितीमधील सदस्यांसह प्रशासनाची पुन्हा एकदा तारांबळ उडणार असल्याचे दिसून येत आहे.

जुलै महिन्यांत सुधार समितीने २७ दिवस वाया घातल्यानंतर २८ जुलै रोजी सभेचे आयोजन केले होते, मात्र ऑगस्ट महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात सभा घेण्याचा निर्णय घेतला असला, तरी या दिवशी दुपारी २ वाजता ठरल्यानुसार स्थायी समितीची साप्ताहिक सभा असते.

यामुळे जे सदस्य सुधार समितीमध्ये सदस्य आहेत, त्यांना स्थायी समितीमध्ये सहभागी होण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. किंवा सुधार समितीची सभा अर्ध्यावर सोडून दुपारी २ वाजेच्या स्थायी समितीच्या सभेत सहभागी व्हावे लागणार आहे. परिणामी त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

महानगरपालिकेत विशेष समित्या आणि वैधानिक समित्या अशा एकूण १० समित्या आहेत. या सर्व समित्यांचे अध्यक्ष भाजपा आणि शिवसेना पक्षातील नगरसेवक आहेत.

मात्र तरीसुद्धा समिती अध्यक्षांकडून तारखेचे आणि वेळेचे योग्य नियोजन होत नसल्याने, एका दिवसांत दोन सभा घेण्यात येत आहेत. त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. यामुळे सत्ताधारी सदस्यांसह विरोधी पक्षातील सदस्यांनी नाराजी दर्शविली आहे. सुधार समितीची बैठक एक दिवस पुढे ढकलण्याची मागणीसुद्धा त्यांनी केली आहे.

मुंबई महानगरपालिकेत स्थायी समितीनंतर सुधार समितीला विशेष महत्वाचे स्थान आहे. मुंबईतील मोकळ्या जागा, आरक्षित भूखंड, महापालिकेची भाडेतत्वावरील मालमत्ता, घरे, भूखंड आणि वास्तू याविषयी निर्णय आणि प्रस्ताव सुधार समितीमध्ये सादर केले जातात.

त्यामुळे मुंबईकरांच्या हितासाठी या समितीत नगरसेवकांना चर्चा करण्यासाठी अधिक अवधी लागतो. परंतु समिती अध्यक्ष आणि सचिव विभागाकडून दुपारी १२ वाजता सभेचे आयोजन केले आहे. तर दुपारी २ वाजता स्थायी समिती सभेचे नियोजन केले आहे.

यामुळे अवघ्या दोन तासांसध्ये सुधार समितीची सभा कशी होईल ? त्यामुळे आता सुधार समितीला सुधारण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नगरसेवक तथा सुधार समितीचे सदस्य सचिन पडवळ यांनी दिली. याविषयी सुधार समितीच्या अध्यक्षा संध्या दोशी यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यामुळे त्यांची भूमिका समजू शकली नाही.

महापालिकेच्या स्थायी समिती व सुधार समिती या दोन समित्यांवर असलेल्या सदस्यांची बुधवारी सभेसाठी चांगलीच तारांबळ उडणार आहे. यात सत्ताधारीसह विरोधी पक्षातील सदस्य आहेत. मात्र ते मूग गिळून गप्प बसल्यामुळे समिती अध्यक्ष व सचिव विभाग अशाप्रकारे परस्पर एका दिवसांत दोन समित्यांच्या सभा अयोजीत करत आहेत.

सुधार आणि स्थायी समिती या दोन वैधानिक समित्या आहेत. त्या मुंबईकरांच्यादृष्टीने महत्वाच्या आहेत. परंतु भाजपा आणि शिवसेना चर्चा करण्यापासून पळत आहे. मुंबईतील मैदाने, भूखंडावर सुधार समितीत चर्चा करण्यात येते, परंतु कमी वेळ मिळावा, यासाठी एका दिवसांत दोन समित्यांच्या सभा जाणुनबुजून ठेवल्या आहेत. यामध्ये सचिव विभागही सहभागी आहे. यावर सभेत आम्ही सर्व सदस्य आवाज उठविणार आहोत.
-अशरफ आझमी, सदस्य, सुधार समिती व स्थायी समिती
सत्ताधारी समिती अध्यक्षांकडून सचिव विभागाला धमकावून अशाप्रकारच्या तारखा आणि वेळ निवडून समिती सभेचे आयोजन केले जात आहे. सचिव विभाग पुर्णपणे सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधला गेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांचा कारभार सत्ताधारी पक्षातीव सदस्यांच्या इशारावर सुरु आहे.
-किशोरी पेडणेकर, विरोधी पक्ष नेत्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT