Money Pudhari
मुंबई

BMC School Staff Salary Delay: १२ तास काम, तरी वेतनाची प्रतीक्षा! मुंबईतील पालिका शाळांमधील कर्मचाऱ्यांची दिवाळी अडचणीत

सहा प्रभागांतील कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी; दिवाळीपूर्वी वेतन आणि सानुग्रह अनुदान मिळण्याची प्रतीक्षा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या सहा प्रभागांतील शाळांमध्ये सफाई कामगार आणि सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या जवळपास एक हजार कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.

नियमित काम करूनही वेळेवर वेतन मिळत नसल्याने घरखर्च, घरभाडे आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी या कर्मचाऱ्यांना कर्ज काढावे लागत आहे. दिवाळी काही दिवसांवर आली असतानाही हातात पैसे नसल्याने सण कसा साजरा करायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

पालिकेने शाळांमधील स्वच्छता व सुरक्षेसाठी मनुष्यबळ पुरविण्याचे कंत्राट एका कंपनीला दिले आहे. एम पूर्व, एम पश्चिम, एन, एल, एस आणि टी या सहा प्रभागांतील शाळांमध्ये या कंपनीचे कर्मचारी कार्यरत आहेत.

गेल्या चार वर्षांपासून पालिकेला मनुष्यबळ पुरविणाऱ्या कंपनीच्या कंत्राटाचे जुलैमध्ये नूतनीकरण करण्यात आले असून ऑगस्टपासून वेतन मिळाले नसल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार आहे.

याबाबत कुर्ला परिसरातील एका शाळेतील कर्मचाऱ्याने सांगितले की, १२ तास काम करून महिन्याला १९ हजार रुपये वेतन मिळते. त्यातून घरखर्च व गावाकडील आई-वडिलांची जबाबदारी सांभाळावी लागते. तीन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याने कर्जाचा आधार घ्यावा लागत असून, परिस्थिती असह्य झाली आहे.

मानखुर्द येथील एका सुरक्षारक्षकाचा भाऊ अभियांत्रिकीचे, तर बहीण विधी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. वेतनाअभावी त्यांचे शुल्क भरण्याची चिंता त्याला सतावत आहे. गोवंडीतील एका सुरक्षारक्षकाने तीन वर्षांपासून वेतनवाढ आणि दिवाळी सानुग्रह अनुदान मिळाले नसल्याची तक्रार केली.

कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्याच्या २० ते २५ तारखेदरम्यान केले जाते. सध्या केवळ सप्टेंबर महिन्याचे वेतन बाकी असून, या महिन्यात सानुग्रह अनुदानासह वेतन देण्यात येणार असल्याचे संबंधित कंपनीकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT