Bribery Case Pudhari
मुंबई

BMC Bribery Case: चेंबूरमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश; महापालिकेचे दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

चेंबूरच्या एम-पश्चिम विभागात लिलावातील हातगाडी व भंगाराचा माल बाहेर काढण्यासाठी १.७० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी महापालिकेच्या दोघांना एसीबीने रंगेहाथ पकडले.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: चेंबूरच्या एम-पश्चिम विभागात लिलावातील हातगाडी व भंगाराचा माल गोडाऊनमधून बाहेर काढून देण्यासाठी एक लाख ७० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मुंबई महापालिकेचे वरिष्ठ निरीक्षक रमेश गोपाळ साळवे (५७) आणि कार्यकारी सहाय्यक विजय सीताराम ठाकरे (३०) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले.

तक्रारदाराकडे एम-पश्चिम विभागात झालेल्या हातगाडी व भंगाराच्या लिलावातील माल गोडाऊनमधून बाहेर काढून देण्यासाठी शासकीय शुल्काव्यतिरिक्त एक लाख ७० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती.

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने २ सप्टेंबर रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली. पडताळणीदरम्यान कार्यकारी सहाय्यक विजय ठाकरे यांनी स्वतःसह वरिष्ठ निरीक्षक रमेश साळवे यांच्यासाठी लाचेचा पहिला हप्ता म्हणून ८० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर ४ सप्टेंबर रोजी एसीबीने सापळा रचला. माहुलगाव येथील एम-पश्चिम विभागाच्या भंगार गोडाऊनमध्ये कार्यकारी सहाय्यक विजय ठाकरे यांनी तक्रारदाराकडून ८० हजार रुपयांची लाच स्वीकारली.

त्यानंतर त्यांनी वरिष्ठ निरीक्षक रमेश साळवे यांना लाचेबाबत माहिती दिली. साळवे यांनी त्यास होकार देत अनुमोदन दिल्याचे कारवाईत निष्पन्न झाले. ठाकरे यांना घटनास्थळी रंगेहाथ पकडण्यात आले, तर साळवे यांना त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT