मुंबई: नगरसेवकांची संख्या वाढल्यामुळे मुंबई महापालिका मुख्यालयातील ऐतिहासिक सभागृह कामकाजासाठी अपुरे पडत आहे. त्यामुळे मुख्यालयाच्या समोरच आझाद मैदान लगत असलेल्या जिमखान्याच्या जागेवर नाट्यगृहाच्या धर्तीवर नवीन सभागृह उभे राहणार आहे.
सुमारे ३३२ आसन क्षमता असलेल्या या सभागृहाची पायाभरणी पावसाळ्यानंतर करण्यात येणार आहे. २०२८ अखेरीस या नव्या सभागृहात महापालिकेची पहिली सभा भरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पालिका मुख्यालयासह सध्याचे ऐतिहासिक सभागृह १८९३ मध्ये उभारण्यात आले. सुरुवातीला नगरसेवकांची संख्या कमी असल्यामुळे हे सभागृह पुरेसे होते. १९९१ नंतर नगरसेवकांची संख्या वाढल्यामुळे सभागृहात जागा अपुरी पडू लागली.
परंतु आता नगरसेवकांची संख्या २३७ इतकी झाली असून सभागृहात पत्रकार, सचिव विभागाचे अधिकारी व अन्य अधिकारी उपस्थित असल्यामुळे जागा अपुरी पडते. त्यामुळे नगरसेवकांना दाटीवाटीने बसावे लागते.
याकडे लक्ष वेधत, सभागृह नेते गणेश खणकर यांनी जिमखान्याच्या ठिकाणी नवीन सभागृह उभारण्याची मागणी लावून धरली. अखेर पालिकेने जिमखान्याच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या टाऊन हॉलचा प्रस्ताव रद्द करून सुसज्ज सभागृह उभारण्याचा निर्णय घेतला.
इमारतीमध्ये काय असणार
तळघर - पार्किंग
तळमजला - खाद्यपदार्थ दुकाने
पहिला व दुसरा मजला - जिमखाना
तिसरा मजला - महापालिका कर्मचाऱ्यांसाठी व्यायामशाळा
चौथा मजला - महापौर, उपमहापौर व राजकीय पक्षांची कार्यालय
पाचवा व सहावा मजला - महापालिका सभागृह आणि पत्रकारांसाठी विशेष जागा